आता कच्चेपार जंगलातही घेता येणार सफारीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST2021-04-04T04:29:23+5:302021-04-04T04:29:23+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील सेलिब्रिटी येथे भेट देत असतात. कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या ...

आता कच्चेपार जंगलातही घेता येणार सफारीचा आनंद
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील सेलिब्रिटी येथे भेट देत असतात. कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाच्या नावलौकिकात भर तर पडेलच सोबतच रोजगारातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी येथे केले.
ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी-कच्चेपार जंगल सफारीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, जिल्हा परिषद सदस्य रूपा सुरपाम, सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे उपस्थित होते.
मोहाडी नलेश्वर येथे १०० एकर जागेवर पर्यटकांकरिता हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे, यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. अगरबत्तीचा प्रकल्प येत असून त्याद्वारे ६०० महिलांना रोजगार प्राप्त होईल. गौण वनउपजावर आधारित ४२ कोटी रुपयांचा प्रकल्पही येणार असून या सर्व कामातून जवळपास दीड हजार नागरिकांना या भागात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते शामाप्रसाद जनवन योजनेंतर्गत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावाला सौर कुंपण, सौर दिवे, गावालगत साफसफाई इ. कामांसाठी १९ गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना सुमारे पाच कोटींचे धनादेश वाटप करण्यात आले. सहायक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले.
कच्चेपार जंगलाची वैशिष्ट्ये
कच्चेपार जंगल सफारी साठी ३८ किलोमीटर ट्रॅक तयार असून या भागात वाघ, बिबट, अस्वल इ. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षिप्रेमींसाठी हे जंगल नंदनवन असून विविध प्रकारचे पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलात दोन तलाव व तीन पाणवठे आहेत. सफारी साठी ७ वाहने मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.