चिमूर : तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींसाठी ग्रामपंचायतमधील २६७ वाॅर्डासाठी एक हजार ४९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी एक हजार ४७३ नामांकन पात्र झाल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. काही ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या तर काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी केली जात आहे.
या बंडखोरांना माघारीसाठी गोड गोड आश्वासने दिली जात आहेतण मात्र, ही आश्वासने भविष्यात पाळली जातीलच याची खात्री नसल्याने बंडखोर उमेदवार सावध झाले आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेतले जाणार आहे. यानंतर तत्काळ उमेदवारांना चिन्ह वाटप होतील. तालुक्यातील थंडीतही आखाडा तापला असून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव होत आहे. मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने आता माघार कोण कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून पॅनल प्रमुखांचे गणित बिघडले आहे.
बंडखोरी करणाऱ्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही बंडखोर दिग्गजांना आमिषे दाखवून माघार घेण्यास भाग पाडले जाणार आहे. माघारीची मुदत संपेपर्यंत गोड गोड बोलून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. सरपंचपदाची इच्छा मनात ठेवून स्थानिक नेतेमंडळींनी निवडणुकीची व्यूहरचना केली. सरपंचपद खुले असणाऱ्या ठिकाणी निकालानंतर आरक्षण पडण्याची दाट शक्यता गृहित धरत या खेळी खेळल्या जात आहेत.
बॉक्स
सरपंच पदाकडे लक्ष
महाविकास आघाडीने अचानक निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. सरपंच पद हे गावचे मोठ्या सन्मानाचे मानले जाते. त्यामुळे या पदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे.
बॉक्स
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या काही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी स्थानिकांसह तालुका व जिल्हास्तरावरील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. यात कोण कुणाची कुरघोडी कशी करतो, हे निकालानंतरच समजणार आहे.