दृष्काळग्रस्त यादीत चंद्रपूरचे नाव नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट; पिकांचे अतोनात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:36 IST2025-09-29T19:32:39+5:302025-09-29T19:36:21+5:30
Chandrapur : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

New crisis ahead for farmers as Chandrapur's name is not in the drought-affected list; Huge loss of crops
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मान्सून विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात मागील तीन दिवस संततधार पाऊस कोसळला. शनिवारी दुपारी १२.३० वाजता सुरू झालेल्या पावसाने तर सायंकाळी ६.३० वाजताच उसंत दिली. चंद्रपुरातील मित्रनगर परिसरातील नागरिकांच्या घरात तर चक्क तीन ते चार फूट पाणी घुसले. विनायक अपार्टमेंटमागील एका घरावर झाड कोसळले. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
त्यामुळे शेतपिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. अशाही स्थितीत जिल्ह्याचे नाव दृष्काळग्रस्त यादीत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार जून ते सप्टेंबरचा सरासरी पाऊस १,०७२ मिमी असतो. मात्र, यंदा सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच १,२५५.३ मिमी प्रत्यक्ष पाऊस कोसळला. म्हणजे साधारण प्रमाणापेक्षा १७ टक्के पाऊस अधिक पडला आहे. मात्र, याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतपिकांना बसला आहे. परिणामी, धान, सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये तळेच निर्माण झाले आहे.
थोडक्यात बचावले चंद्रपुरातील कुटुंब
नागपूर रोडवरील जनता कॉलेज चौकाजवळच्या सिद्धिविनायक अपार्टमेंटचे चौकीदार दिनेश उईके यांच्या टिनाच्या घरावर एक मोठे झाड कोसळले. शेजारी राहणाऱ्या एका भगिनीने प्रसंगावधान राखून आवाज दिल्याने हे कुटुंब घराच्या बाहेर निघाले व थोडक्यात बचावले. नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ते झाड काढले.
मित्रनगरात शिरले पाणी
शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने मित्रनगर परिसरातील घरात पाणी शिरले. अनेकांचे तर अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले.
आठव्यांदा भोयगाव पुलावरील वाहतूक बंद
कोरपना : अधून-धून पडणाऱ्या
पावसामुळे वर्धा नदीवरील भोयगाव धानोरा मार्गावरील पूल शनिवारी मध्यरात्री पाण्याखाली आला. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रात्रीपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
हलक्या धानाची माती
नागभीड : गेल्या तीन चार दिवसांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने हलक्या धानाची माती केली आहे. शेकडो शेतकऱ्यांचे धान पीक बांधात पडल्याने मातीमोल झाले आहे. प्रशासनाने योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे. नागभीड तालुक्यात हलके (ठोकळ) आणि भारी (बारीक) या प्रकारच्या धानाचे उत्पादन घेतल्या जाते. बारीक थानापेक्षा ठोकळ थानास पाणी कमी लागते आणि लवकर निघते. तसेच रोगांचा प्रादुर्भावही नसतो. त्याचबरोबर शासनाच्या हमी भाव केंद्रांवर ठोकळ धानाची सहज विक्री होते. या कारणांमुळे गेल्या काही वर्षापासून या तालुक्यातील शेतकरी ठोकळ धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड करू लागले आहेत. यावर्षीही तालुक्यातील २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १५ हजार हेक्टरवर या ठोकळ धानाची लागवड करण्यात आली असावी असा अंदाज आहे. आता हे धान पीक निसवून तयार आहे. हा पाऊस पडला नसता तर यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आठ दहा दिवसांत धानाची कापणी सुरू केली असती. मात्र नेमक्या याचवेळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.