शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:16 AM2017-12-03T00:16:12+5:302017-12-03T00:17:48+5:30

Modern farming lessons for farmers to get | शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे

Next
ठळक मुद्देगावखेड्यांत जागर : २० गावांमध्ये सुरू झाले पालकमंत्री कृषी वाचनालय

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शेतकऱ्यांना बदलत्या काळानुसार आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, पारंपरिक शेतीतून सुटका होऊन आर्थिक प्रगती करता यावी, या हेतूने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले. हे वाचनालय २० गावांत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच शेतकऱ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची संधी मिळाली आहे.
पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकाभिमुख उपक्रमांतून विकासकामांना चालना मिळाली. शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ना. मुनगंटीवार यांनी विशेष पुढाकार घेऊन काही लक्षवेधी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. चंद्रपूर, मूल, बल्लारपूर आणि पोंभूर्णा चार तालुक्यांतील २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय करण्यास पुढाकार घेतला.
चंद्रपूर तालुक्यातील मामला, चेक निंबाळा, शिवणी चोर, मूल तालुक्यातील चिचाळा, उथळपेठ, बोरचांदली, नांदगाव, भवराळा, हळदी, दाबगाव, गडीसुर्ला, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव, चेक बल्लारपूर, घाटकुळ, पिपरी देशपांडे, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्टा, नवेगाव मोर आणि बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आदी २० गावांमध्ये पालकमंत्री कृषी वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात १०० पुस्तकांचा एक संच उपलब्ध करण्यात आला. ही सर्व पुस्तके कृषी विषयक मार्गदर्शन करणारी आहेत. विविध प्रकारची खते व बियाण्यांची माहिती, नवनवे पीक कसे घ्यायचे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी वाचनालय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषी उत्पन्नवाढीला चालना
पालकमंत्री कृषी वाचनालयातील पुस्तकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची माहिती गावातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर प्रबोधनसभा तसेच प्रचार व प्रसाराचे कार्य नियमितपणे सुरू राहणार आहे. या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या लोकोपयोगी उपक्रमामुळे कृषी उत्पन्न वाढीला चालना मिळणार आहे.

Web Title: Modern farming lessons for farmers to get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.