लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगपालिकेअंतर्गत येणाऱ्या ३७ शाळंच्या मुख्याध्यापकांची सभा महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती राहुल पावडे तसेच राजू गोलीवार उपस्थित होते. या सभेत महापौर घोटेकर यांनी शिक्षण विभागाचा चांगलाच क्लास घेतला. महानगरपालिकेच्या शाळेतील सन २०१७-१८ मध्ये तीन शाळा मॉडेल करणे, १० शाळांची चित्र सजावट करणे, सर्व शाळांना डेक्स बेंच देणे, शाळेत खेळणी साहित्य लावणे, तसेच शाळाची किरकोळ दुरूस्ती करणे यावर सभेत चर्चा करण्यात आली. महापौर अंजली घोटेकर यांच्या संकल्पनेतून शिक्षकांना स्पोकन इंग्लीश कोर्स व अबॅकसचा कोर्स महानगपालिकेच्या वतीने सुरू केला जात आहे. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी खान यांच्या सहकार्याने शिक्षकांना स्पोकन इंग्लीशचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांची गणितातील गुणवत्ता वाढविण्यासाठी माऊलकर यांच्या सहकार्याने अबॅकसचे प्रशिक्षण शिक्षकांना विनामुल्य देणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्र्वास महापौर यांनी व्यक्त केला. यावेळी सभापती राहुल पावडे यांनी मनापाच्या शाळाची पटसंख्या व गुणवता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. महानगरपालिका भौतिक सुविधांची पूर्तता करण्यास कटीबध्द आहे, असे सांगितले. शाळेतील सजावट, रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी मुलभुत गरजा शाळेत उपलब्ध करण्याच्या सूचना महापौरांनी शिक्षण विभागाला दिल्या. शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढवावी व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. जेणेकरून मनपा शाळेकडे पालक आकर्षित होतील, अशा सूचनाही महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
महापौरांनी घेतला शिक्षण विभागाचा क्लास
By admin | Updated: May 19, 2017 01:15 IST