ब्रह्मपुरीतील रामदेव बाबा साॅल्व्हेंट्स कंपनीला स्फोटानंतर भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 21:04 IST2025-11-19T21:04:13+5:302025-11-19T21:04:27+5:30
डिस्टिलेशन प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी : जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती

ब्रह्मपुरीतील रामदेव बाबा साॅल्व्हेंट्स कंपनीला स्फोटानंतर भीषण आग
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा उदापूर येथील रामदेव बाबा सॉल्व्हेंट्स (आरबीएस) कंपनीत बुधवारी (दि. १९) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.
स्फोटाच्या आवाजाने जवळील जिलबोडी, उदापूर येथील घरांच्या दारा-खिडक्यांना जबर हादरा बसला. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. कंपनी परिसरात तब्बल १.२५ लाख लिटर इथेनॉलचा साठा असून, त्याच ठिकाणच्या डिस्टिलेशन प्लांटला आग लागली आहे, आग लागल्यानंतर परिसरात दाट धुराचे लोट पसरल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री ७:30 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे समजले.
घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही आणि मूल येथील अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील दोन फायर ब्रिगेड तसेच वडसा येथील पथकही मदतीसाठी पोहोचले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फोमची आवश्यकता असल्याने महानगरपालिका चंद्रपूर येथून दोन फायर टेंडर फोम सोल्युशनसह रवाना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आग मोठी असल्यामुळे विझवण्याचे काम अद्यापही सुरू असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच आहेत. सुदैवाने, सध्या कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली.