ताडोबा सफारीतील 'स्थानिक कोटा' घोटाळा उघड, एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:07 IST2025-12-31T14:06:17+5:302025-12-31T14:07:34+5:30
Chandrapur : बनावट आधारकार्डद्वारे सात कुझर बुक; वनविभागाचा प्रहार

'Local quota' scam in Tadoba Safari exposed, case registered against agents
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रकल्पातील पर्यटन व्यवस्थेतील ताडोबा-अंधारी व्याघ्र 'स्थानिक कोटा'चा गैरवापर करून बनावट आधारकार्डच्या माध्यमातून शासन आणि स्थानिक नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ताडोबा प्रशासनाने दुर्गापूर पोलिस ठाण्यात संबंधित एजंट्स व व्यक्तींविरुद्ध मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ डिसेंबर २०२५ रोजी पाच वेगवेगळ्या आयडीद्वारे एकूण सात क्रुझर सफारींची बुकिंग करण्यात आली होती. ख्रिसमस सुटीच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर रोजी सकाळच्या सफारीदरम्यान मोहर्ली (कोअर) प्रवेशद्वारावर वनविभागाने पर्यटकांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. या तपासणीत २३ पर्यटकांपैकी नऊ जणांच्या आधारकार्डवरील फोटो व माहितीमध्ये तफावत आढळून आली, तर १० पर्यटकांनी ओळखपत्र दाखविण्यास नकार दिला. याशिवाय कोलारा गेट परिसरातही काही एजंटांकडून पर्यटकांकडून अतिरिक्त पैसे उकळून सफारीचे आमिष दाखविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक नावाने बुकिंग करून ऐनवेळी ती रद्द करणे आणि स्वतःकडील पर्यटकांना प्रवेश देणे, असा प्रकार सुरू असल्याचेही समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत दुर्गापूर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
दुर्गापूर पोलिस म्हणतात, तक्रार आली; पण गुन्हा दाखल नाही
याप्रकरणी दुर्गापूर पोलिस ठाण्यात चौकशी केली असता अशाप्रकारची तक्रार ठाणेदारांकडे आलेली आहे. त्यांनी ही तक्रारीत चौकशीत घेतलेली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.
'ताडोबाच्या पर्यटन व्यवस्थेत पारदर्शकता राखणे, ही आमची जबाबदारी आहे. बनावट कागदपत्रांचा वापर हा गंभीर गुन्हा असून, यापुढे सर्व प्रवेशद्वारांवर कडक तपासणी केली जाईल. दोषी आढळल्यास पर्यटकांवरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येईल.'
- डॉ. प्रभू नाथ शुक्ला (भा.व.से.) स क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर