पत्रकारच लोकशाहीचे संरक्षक- अहीर

By Admin | Updated: June 10, 2014 23:58 IST2014-06-10T23:58:38+5:302014-06-10T23:58:38+5:30

पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार

Journalist is the patron of democracy - Ahir | पत्रकारच लोकशाहीचे संरक्षक- अहीर

पत्रकारच लोकशाहीचे संरक्षक- अहीर

चंद्रपूर : पत्रकार हेच लोकशाहीचे संरक्षक आहेत. त्यांच्या योगदानामुळेच जनतेचे घटनादत्त अधिकार सुरक्षित आहेत. देशात नवे बदल घडून येत आहेत. पत्रकारांमुळेच जनसमस्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचतात, असे गौरवोद्गार चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी काढले. पंजाबी सेवा समितीच्या सभागृहात महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ग्रामीण पत्रकारांच्या मेळाव्यात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
प्रमुख पाहुणे आमदार नाना श्यामकुळे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, सेवानिवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, संपादक संघाचे विदर्भस्तरीय अध्यक्ष डी.के. आरीकर, संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार होते. याप्रसंगी पत्रकार अमर बुद्धारपवार यांना स्मृतिशेष बाळकृष्ण पोटदुखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाकडून निर्भीड पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकारिता ही चौथी शक्ती असून पत्रकारांमुळेच राज्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभते. शासन, प्रशासनावर वचक निर्माण होतो, असेही ते म्हणाले.
आमदार श्यामकुळे यांनी पत्रकारितेत प्रामाणिकपणा आणावा, बातमीची खातरजमा करूनच त्या प्रकाशित व्हाव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रवीण बडकेलवार, डी.के. आरीकर यांनीही मार्गदर्शन केले. मेळाव्याचे अध्यक्ष किशोर पोतनवार यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांचे विदारक सत्य मांडले. ६० वर्षांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पेंशन योजना सुरू करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने शिक्षक मतदार संघाप्रमाणे पत्रकारांचा मतदार संघ निर्माण करून विधानसभेत पत्रकारांना प्रतिनिधीत्व प्राप्त करून द्यावे, अशी मागणी केली.
दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना याप्रसंगी आदरांजली अर्पण करण्यात आली. किरण बुटले यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक महासचिव राजेश सोलापन यांनी केले. सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या मेळाव्याला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुरेश तावाडे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Journalist is the patron of democracy - Ahir