चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:35 IST2025-12-25T11:35:05+5:302025-12-25T11:35:35+5:30
राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात तेलंगणा राज्यातील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
ख्रिसमसच्या उत्साहाच्या वातावरणात चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण कार अपघातात तेलंगणा राज्यातील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाला लागलेली एक डुलकी या मोठ्या अनर्थाला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहाटेच्या सुमारास काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील काही लोक एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम आटोपून सर्व जण कारने आपल्या घराकडे निघाले होते. २५ डिसेंबर रोजी पहाटे १:३० वाजताच्या सुमारास त्यांची कार राजुरा-तेलंगणा मार्गावरील सोंडो गावाजवळ आली. यावेळी चालकाचा डोळा लागल्याने भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील एका छोट्या पुलावरून थेट खोलगट खड्ड्यात कोसळली.
५ जण मृत्यूशी झुंजतायत
हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोंडो गावाजवळ हा रस्ता तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे. सोंडो गावाजवळील ज्या पुलावर ही घटना घडली, तिथे कार पलटी होऊन थेट खड्ड्यात गेल्याने प्रवाशांना बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही. आनंदाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या या कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.