चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, रेल्वे बोगदाही पाण्यात; जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:11 IST2025-09-02T11:10:07+5:302025-09-02T11:11:07+5:30
धानोरा ते भोयगाव मार्गावर पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. चिचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे काटवन ते मूल (चिचोलीमार्गे) मार्ग बंद झाला.

चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, रेल्वे बोगदाही पाण्यात; जनजीवन विस्कळीत
चंद्रपूर : सोमवारी रात्री सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरले आहे. चंद्रपूर शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.
मंगळवारी सकाळी काही भागात पाऊस पडला. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून ईरई धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाची तीन गेट्स एक मीटरने आणि चार गेट ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहेत.
पूरस्थितीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वरोरा-अर्जुनी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव खूर्द ते अर्जुनी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. मौजा गुंजाळा (ता. भद्रावती) येथे नाल्याचे पाणी वाढून काही घरांमध्ये शिरले असून गुंजाळा–कचराळा रस्त्यावर वाहतूक थांबली आहे.
धानोरा ते भोयगाव मार्गावर पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. चिचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे काटवन ते मूल (चिचोलीमार्गे) मार्ग बंद झाला असून सध्या मारोडा मार्ग पर्याय म्हणून उपलब्ध ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सततचा पाऊस आणि वाढती जलपातळी लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.