शेतकरी किडनी विक्री प्रकरणातील आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अंतरिम जामिनावर होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:22 IST2026-01-05T13:21:20+5:302026-01-05T13:22:38+5:30
Chandrapur : किडनी तस्करीच्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय जाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला. प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अंतरिम जामिनावर आज ५ जानेवारी रोजी चंद्रपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Hearing to be held on interim bail of Dr. Ravindrapal Singh, accused in farmer kidney sale case
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किडनी तस्करीच्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय जाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचला. प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अंतरिम जामिनावर आज ५ जानेवारी रोजी चंद्रपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. एलसीबीकडून डॉ. रवींद्रपाल सिंग याच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात येणार असून, या सुनावणीकडे तपास यंत्रणेसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, विशेष तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने किडनी पीडितांच्या यादीतील उत्तर प्रदेशातील एका पीडिताला शनिवारी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या पीडितावर २०२४ मध्ये तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी व डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी किडनी शस्त्रक्रिया केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी याआधी सोलापूर येथील डॉ. क्रिष्णा आणि हिमांशू भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. यात हिमांशू भारद्वाजची किडनी कंबोडियात न काढता त्रिची येथेच काढल्याचे उघड झाले होते. उत्तर प्रदेशातील पीडिताची किडनीही काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
कागदपत्रांतून पुढे येणार किडनी पीडितांचा आकडा
किडनी रॅकेटमधील डॉ. क्रिष्णा व हिमांशू भारद्वाज यांचा साथीदार पॉल तसेच डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली आहेत. तसेच कोलकाता येथील प्रयोगशाळेतील वैद्यकीय व रक्त तपासणीच्या कागदपत्रांसाठी एक विशेष पथक पाठविण्यात आले आहे. त्यांना कागदपत्रे मिळाल्यानंतर नेमक्या किती लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याबाबत माहिती पुढे येणार आहे.