रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:47+5:302021-09-22T04:31:47+5:30
रेल्वे मार्गाची नागरिकांची मागणी मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...

रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना त्रास
रेल्वे मार्गाची नागरिकांची मागणी
मूल : येथून गडचिरोलीसाठी नवीन रेल्वे मार्ग तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास गडचिरोली व चंद्रपूर जोडले जाईल. पर्यायाने येथील बाजारपेठेला चालना मिळेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरपना - कातलाबोडी रस्त्याची दुरवस्था
कोरपना : तालुक्यातील कोरपना ते कातलाबोडी रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारक व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग कातलाबोडीसह बोरगाव, हातलोणी, तीर्थक्षेत्र घाटराई आदी गावांना पुढे जोडला गेला आहे. तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, उपकोषागार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शासकीय गोदाम, शासकीय आदिवासी मुलाचे वसतिगृह, वसंतराव नाईक महाविद्यालय येथे जाण्यासाठी याच प्रमुख मार्गाने जावे लागते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेलचेल असते; परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवास करणे जिकिरीचे ठरते आहे.
उद्योगांची निर्मिती करावी
सिंदेवाही : तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी आहे.
कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ
राजुरा : वाहनांवर कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे. असे असतानाही काही तरुण मोठ्या प्रमाणात दुचाकीवर हॉर्न लावून वाजवितात. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी आहे.
सिंदेवाही तालुक्यात विजेचा लपंडाव
सिंदेवाही : सिंदेवाही तालुका हा धान पिकावर अवलंबून असलेला तालुका आहे आणि यावर्षी पाऊसही बऱ्यापैकी झाला नाही. त्यामुळे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हा कृषिपंपाच्या साहाय्याने शेतीला पाणी देऊन कसेबसे पीक जगवत आहे. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकरीही वैतागले आहेत.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण
सिंदेवाही : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासनाने निर्माण केलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय सध्या रिक्त पदाच्या ग्रहणामुळे बेवारस स्थितीत पडल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. या ठिकाणी सर्व महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी पदभार देऊन कार्यालयाचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र वरिष्ठांचे याकडे लक्ष नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. रिक्त पदामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांसह मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक ३, कृषी सहायक २, शिपाई ३, ट्रेसर २, वाहन चालक १ अशी १३ पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी ही दोन्ही पदे अतिरिक्त कारभार देऊन सामान्य सुरू आहे. कृषी पर्यवेक्षकाचे महत्त्वाचे पद असताना कृषी सहायकांकडे अतिरिक्त पदभार देऊन कामकाज पाहावे लागत आहे.