आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना रोख रक्कम व साहित्याची भेट

By Admin | Updated: November 17, 2015 02:03 IST2015-11-17T02:03:59+5:302015-11-17T02:03:59+5:30

तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर

A gift of cash and literature to the widows of suicide victims | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना रोख रक्कम व साहित्याची भेट

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना रोख रक्कम व साहित्याची भेट

पोंभुर्णा : तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी घरी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व भाऊबीजेनिमित्त त्यांना घरगुती साहित्य, साडी-चोळी व रोख रक्कम भेटस्वरूपात देण्यात आले.
सततच्या नापिकीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील पोंभुर्णा, घोसरी, पिपरी देशपांडे येथील शेतकऱ्यांनी नापिकीमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे सावट कोसळले. त्यामुळे भाऊबीजेच्या सणाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी पोंभुर्णा येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी डोमाजी गुरुनुले यांच्या घरी येऊन त्यांची विधवा पत्नी वैशाली गुरुनुले तसेच पिपरी देशपांडे येथील विधवा जनाबाई भिवाजी देशमुख आणि घोसरी येथील विधवा वंदना विजय लोनबले या तीनही महिलांना साडीचोळी, घरगुती साहित्य व रोख रक्कम यावेळी भेटवस्तू म्हणून देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी जाऊन घेतल्या तसेच आपण जर व्यवसाय करण्यास उत्सुक असाल तर आपल्याला बँकेमार्फत कर्जाची पूर्तता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणात काही अडचणी निर्माण झाल्यास पोंभुर्णा येथील तहसीलदारामार्फत आम्हाला कळविल्यास आम्ही आपल्याला जरूर मदत करू, असे आश्वासनसुद्धा जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी उपस्थित विधवांना व त्यांच्या आप्तांना यावेळी दिले.
यावेळी त्यांच्यासोबत पोंभूर्णाचे नायब तहसीलदार श्रीनिवास तनगुलवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक राजू धांडे, जिल्हा नाझर सुनील तुंगीडवार, शैलेश धात्रक, मनोज आकनुरवार, मंडळ अधिकारी संजय कानकाटे, तलाठी आर.बी. लोणकर, प्रमोद काळे, आशीष भसारकर आदी कर्मचारी उपस्थित होते. डॉ.दीपक म्हैसेकर हे पोंभुर्णा येथे आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी गर्दी केली. परंतु कार्यक्रम आटोपल्यानंतर म्हैसेकर निघून गेले. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A gift of cash and literature to the widows of suicide victims