मालमत्ता करवाढविरोधातील आंदोलनाचा पाचवा दिवस

By Admin | Updated: March 12, 2016 01:22 IST2016-03-12T01:22:30+5:302016-03-12T01:22:30+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले

Fifth day for agitation against property mileage | मालमत्ता करवाढविरोधातील आंदोलनाचा पाचवा दिवस

मालमत्ता करवाढविरोधातील आंदोलनाचा पाचवा दिवस

आंदोलन आणखी तीव्र : मनपाने करवाढ मागे घ्यावी
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. यामुळे नागरिकांचे कंबरडेच मोडले असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या करवाढीविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवार उपोषणाचा चौथा दिवस असून आंदोलन आणखी तीव्र होत आहे.
काल गुरुवारी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता लोढीया, लालुमती यादव, तारावती यादव, रमाबाई अहिर उपोषणाला बसल्या होत्या. माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेता राहुल पुगलिया, शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन दुसऱ्या दिवशी बसलेल्या उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी उपोषणास बसणाऱ्या नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, देवीदास गेडाम, श्रीनिवास पारनंदी व भारत जंगम यांचे माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले.
वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला ही करवाढ आणखी त्रस्त करणारी आहे. लहान मोठे व्यापारी, फुटपाथवरील कपडे विक्रेता, चहा टी स्टॉल किंवा हातठेलाधारक यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. हे लहान मोठे व्यापारी हातावर आणून पानावर खातात. एखाद्या छोटेखानी घरात त्यांचे वास्तव्य असते. मात्र आता त्या मालमत्तेसाठी त्यांचा चार ते पाच पट कर भरावा लागणार आहे. यामुळे ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. महानगरपालिकेने पूर्वीच्या कराप्रमाणे कर आकारणी करावी. जेणेकरून गोरगरीबांची उपासमार होणार नाही. त्यांना त्रास होणार नाही. जनतेच्या हितासाठी मनपाचे धोरण असावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीने पुढाकार घेऊन ७ मार्चपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Fifth day for agitation against property mileage