शेतकरी किडनी विक्री प्रकरण : वैद्यकीय तपासणी करणारे भारतातील दोन डॉक्टर 'एलसीबी'च्या 'रडार'वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:39 IST2025-12-30T15:37:47+5:302025-12-30T15:39:09+5:30
Chandrapur : क्रिष्णा, हिमांशू भारद्वाजसह आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Farmer's kidney sale case: Two doctors from India who conducted medical examinations are on the 'LCB's' radar
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किडनी विक्रीसाठी कंबोडिया येथे पाठवण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करणाऱ्या भारतातील दोन डॉक्टरांची ओळख 'एलसीबी'च्या पथकाला पटली आहे. एक डॉक्टर दिल्ली व एक तामिळनाडू येथील असून, 'एलसीबी'चे पथक 'रडार'वर असल्याची माहिती आहे. दरम्यान, रामकृष्ण व हिमांशू भारद्वाज यांना सोमवारी (दि. २९) न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपी असलेले सहा अवैध सावकारही न्यायालयीन कोठडीत आहे.
रामकृष्ण व हिमांशू हे दोघे गरजूंना हेरून किडनी विक्रीसाठी बाध्य करायचे. त्यानंतर त्यांना कोलकत्ता येथील पॅथॉलॉजीमध्ये नेऊन रक्त तपासणी, वैद्यकीय तपासणी करायचे. ही तपासणी कोणते डॉक्टर करत होते. या अनुषंगाने पोलिसांचे पथक तपासात गुंतले होते. रामकृष्ण व हिमांशू हे पोलिस कोठडीत असताना त्यांनी या दोन्ही डॉक्टरांची नावे पोलिसांना सांगितली. तेव्हापासून एलसीबीचे पथक या डॉक्टरांच्या शोधात रवाना झाले आहेत. हे डॉक्टर सापडल्यानंतर नेमक्या किती लोकांच्या किडन्या काढण्यात आल्या याबाबतचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात हिमांशू व क्रिष्णाचा साथीदार असलेला तिसरा आरोपी अद्यापही पोलिसांना गवसला नसून त्याच्या शोधात पोलिसांचे पथक तळ ठोकून असल्याची माहिती आहे.
बँक व फोन-पे व्यवहार उघड; सावकारीचा तपासही 'एलसीबी'कडे
- रोशन कुडे व सावकार यांच्यात बँक खात्यांद्वारे तसेच फोन-पेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
- या व्यवहारांचा सखोल तपास करण्यात येत असून, रोख रकमेचे व्यवहार झाले आहेत का, याचीही पडताळणी सुरू आहे.
- तसेच आरोपींनी या कथित व्यवसायातूनच मालमत्ता कमावली आहे का, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
- विशेषतः आरोपींच्या नावावर असलेल्या कृषी जमिनींची कागदपत्रे, खरेदी-विक्री व्यवहार तसेच उत्पन्नाचे स्रोत यांची बारकाईने पडताळणी केली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ब्रह्मपुरी पोलिसांकडून तपास काढून 'एलसीबी'कडे देण्यात आला आहे.