वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:22 IST2025-10-27T09:22:14+5:302025-10-27T09:22:43+5:30
चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना
चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोमा बीटातील शिवरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. रात्री १२ वाजताच्या सुमारास मृतदेह गवसला. नीलकंठ भुरे (६०)असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून ते माजी सरपंच होते. या महिन्यातील परिसरातील दुसरी घटना आहे.
नीलकंठ भुरे यांची शेती शंकरपूर चिमूर रोड लगत शिवरा फाट्यावर आहे. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ते आपल्या शेतावर शेत पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतातच वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. मृत शरीर ओढत नेऊन नाल्याच्या काठावर ठेवले होते. तिथेच त्यांचे दोन्ही पाय खालेल्या अवस्थेत होते. सायंकाळी आठ वाजता पर्यंत घरी का बरं आले नाहीत म्हणून घरच्यांनी शेतावर शोध मोहीम राबविली. त्यांना शोध लागला नाही. मात्र त्या ठिकाणी त्यांची सायकल असल्यामुळे त्यांना शंका आली. त्यामुळे पुन्हा गावात जाऊन जवळपास ३० ते ४० लोक घेऊन पुन्हा शेतात जाऊन शोधमोहीम राबवली असता त्यांचा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत नाल्या काठी मिळून आला. या घटनेची माहिती चिमूर वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर वनक्षेत्रपाल यु. बी. लोखंडे वनरक्षक बुरले व इतर कर्मचारी उपस्थित होते. भिसीचे ठाणेदार भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक थूटे, पोलीस हवालदार घोडमारे आपल्या ताफ्यासह हजर होते.
घटनेची माहिती मिळतात जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजुकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक, शिवराचे सरपंच अतुल नन्नावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाही. तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर सोमवारी पहाटे दीड वाजता चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल व मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तात्काळ कुटुंबाला ३० हजार रुपये रोख आणि नऊ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे मृतदेह नेण्यात आला.