दुरूस्तीच्या नावाखाली वीज भारनियमन
By Admin | Updated: May 7, 2014 14:22 IST2014-05-07T14:22:44+5:302014-05-07T14:22:44+5:30
उन्हाळ्याचे दिवस असूनही वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागात भारनियमन सुरू केले आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा बंद केल्यानंतर ठरवून दिलेल्या

दुरूस्तीच्या नावाखाली वीज भारनियमन
हरदोना : उन्हाळ्याचे दिवस असूनही वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागात भारनियमन सुरू केले आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा बंद केल्यानंतर ठरवून दिलेल्या नियोजित वेळेत वीज येत नसल्याने विजेवर व्यवसाय करणार्या व्यवसायिकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वीज वितरण कंपनीबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.
राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे. भारनियमन करताना ठरवून दिलेल्या नियोजित वेळेत वीज पुरवठा सुरू करणे आवश्यक असते. वीज नागरिकांसाठी आवश्यक गरज झाल्याने नागरिक वीज येण्याची प्रतीक्षा करीत असतात. मात्र ठरवून दिलेली वेळ निघून गेल्यानंतरही पुरवठा सुरू करण्यात येत नसल्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना अनुभव आहे. याबाबत वितरण कंपनीकडे विचारणा केल्यास दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून अधिकारी मोकळे होतात.
मात्र बिलाचा नियमित भरणा करूनही महावितरण कंपनी नियोजित वेळेत वीज पुरवठा का सुरू करीत नाही, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. नागरिकांना उन्हाच्या दाहकतेपासून बचाव करण्यासाठी कुलरचा वापर वाढला आहे. विजेवर व्यवसाय करणार्यांची संख्या अधिक आहे. महावितरणने ग्रामीण भागात सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ या दोन वेळेत भारनियमन केले जाते.
दिवसभरात सहा तासांचे भारनियमन केल्यानंतर नियोजित वेळेत पुरवठा सुरू करणे गरजेचे असताना दुरूस्तीच्या नावाखाली दहा तासांपेक्षा अधिक भारनियमन होत असल्याने त्याचा परिणाम बहुसंख्य गावात असणार्या पाणी पुरवठा योजनेवर होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेच्या अध्र्याअधिक टाक्या रिकाम्या राहत आहेत. त्याचा नाहक फटका बसत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुरूस्तीच्या नावाखाली जादा भारनियमनाचा बडगा सहन करावा लागत आहे. भारनियमन बंद करावे अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)