थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला आणि मग रेल्वे अपघाताचा केला बनाव; आई वडिलांनीही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:16 IST2026-01-09T14:14:57+5:302026-01-09T14:16:09+5:30
Chandrapur : दारूच्या नशेने पेटलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट थेट खुनात झाला. क्षणिक संतापातून थोरल्या भावाने धाकट्या भावाचा जीव घेतल्यानंतर, हा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर टाकून अपघाताचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे उघडकीस आला आहे.

Elder brother killed younger brother and then faked a train accident; Parents also supported him
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर (चंद्रपूर) : दारूच्या नशेने पेटलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट थेट खुनात झाला. क्षणिक संतापातून थोरल्या भावाने धाकट्या भावाचा जीव घेतल्यानंतर, हा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर टाकून अपघाताचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजताच्या सुमारास घडली.
गणेश विश्वनाथ भोयर (२५), रा. इंदिरा नगर, विसापूर असे मृत धाकट्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ गुरुदास विश्वनाथ भोयर (२७), वडील विश्वनाथ झुंगा भोयर (७१) व आई कौशल्या विश्वनाथ भोयर (५५) यांना बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विश्वनाथ भोयर यांची कौशल्या ही दुसरी पत्नी आहे. चार मुलांचे हे कुटुंब असून, गुरुदास व गणेश हे दोघे आई- वडिलांसह विसापूर येथे एकत्र राहत होते. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात नेहमीच वाद व्हायचे. बुधवारी रात्री सुमारे ९:४५ वाजता दारूच्या नशेत दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यावर गुरुदासने गणेशच्या डोक्यावर लोखंडी वासल्याने जोरदार प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात गणेशने जागीच प्राण सोडले.
घटनेची कुणकुण लागू न देता, मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने गुरुदासने गणेशच्या पायाला दोरी बांधून मृतदेह गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर ओढून नेत रेल्वे अपघाताचा बनाव केला. मात्र, रात्री गस्तीवरील रेल्वे कर्मचारी दामाजी नरोटे यांना संशय येताच त्यांनी तत्काळ रेल्वे व बल्लारपूर पोलिसांना कळवले. सकाळी डॉग स्क्वॉडने घटनास्थळाची पाहणी केली असता, घर स्वच्छ करून रक्ताचे व इतर पुरावे नष्ट केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१), २३८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणाचा तपास राजुरा उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार व पोलिस निरीक्षक विपीन इंगळे यांच्यासह मार्गदर्शनात उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड करीत आहेत.
पैशाच्या वादातूनच रक्तपात ?
गणेशची आई कौशल्या यांच्या गोंडपिपरी येथील वडिलोपार्जित घराच्या विक्रीतून सुमारे सात लाख रुपयांचा हिस्सा मिळाला होता. त्या पैशातून नवीन घर बांधायचे होते. मात्र, दारूच्या व्यसनामुळे पैसा खर्च होईल म्हणून कुटुंबात सतत वाद व्हायचे. हेच हत्येमागील कारण असावे, अशी चर्चा आहे.