कार अपघातात गडचिरोलीतील पोलीस निरीक्षक सचिन माळी यांच्या पत्नीसह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:38 IST2019-01-08T19:37:48+5:302019-01-08T19:38:35+5:30
भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

कार अपघातात गडचिरोलीतील पोलीस निरीक्षक सचिन माळी यांच्या पत्नीसह दोघांचा मृत्यू
चंद्रपूर : भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना मूल-चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजतादरम्यान घडली. आकांक्षा सचिन माळी (२८), पवन नन्नावरे (२८) अशी मृतकांची नावे आहेत. अंश सचिन माळी (२), सागर सूर्यकांत शिंदे (२८), नितीन वाढई (२५) अशी जखमींची नावे असून मृत व जखमी हे सोलापूर येथील रहिवासी आहेत.
आकांक्षा माळी या गडचिरोली येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत पती सचिन माळी यांना भेटण्याकरिता मुलगा अंश व भावासह एमएच १३ सीएस ३९११ क्रमांकाच्या कारने जात होत्या. चंद्रपूरहून मूलमार्गे जाताना मूलच्या अलीकडे असलेल्या केसलाघाट परिसरात कार चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. या भीषण अपघातात कारमधील पाचही जण गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी धाव घेतली. लगेच रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र आकांक्षा माळी व पवन नन्नावरे यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. अन्य तीन जखमींवर उपचार सुरू आहे. या घटनेची नोंद मूल पोलिसांनी घेतली आहे.