चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, बाजारपेठेमध्येही पाहिजे तसा उत्साह नसल्यामुळे छोट्या, मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. रंगपंचनीच्या पूर्वसंध्येलाही व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही निरुत्साह बघायला मिळाला. त्यामुळे होळीचे रंग यावर्षीही उडालेलेच आहे.
होळी सणावर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मर्यादा आली आहे. कोरोनाच्या सावटामध्येच होळी साजरी करावी लागणार असल्याने रंग खेळण्याचा आनंदही घेता येणार नाही.
काही दिवसांपासून कोरोनाचे संसर्ग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली असून वर्षभरामध्ये तब्बल ४२० जणांचा कोरोनाने जीव घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती तसेच विविध उपाययोजना केल्या आहे. त्याचाच एक भाग म्हणून गर्दी जमविण्यावर तसेच सण समारंभावरही निर्बंध घालण्यात आले आहे. एवढेच नाही तर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र नागरिक फारसे गंभीर नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. होळीनिमित्त नागरिक रंगोत्सव साजरा करतात. यासाठी काही गावांत सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातता. मात्र यावरही निर्बंध आले आहेत.
यावर्षी कोरोनाचे सावट घोंघावत आहे. घराबाहेर पडताना संसर्गाची धास्ती वाढत आहे. त्यामुळे होळी घरच्या घरीच साजरी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. परिणामी बाजारपेठेमध्येही निरुत्साह बघायला मिळत आहे.
बाॅक्स
पिचकारी, रंगाचीही मागणी घटली
होळीनिमित्त फेब्रुवारी महिन्यापासून व्यापारी तयारी करतात. या सणातून व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल असते. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध रंग तसेच पिचकारी बोलावल्या जायची. यावर्षी मात्र मोजकाच माल बोलावला आहे.
बाॅक्स
लहान व्यावसायिकांचे नुकसान
मागील वर्षी तसेच यावर्षीही कोरोनाचे सावट घोंघावत आहे. त्यामुळे मोठ्या व्यावसायिकांसोबत लहान व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकजण चौकाचौकात रंग, पिचकारी तसेच अन्य साहित्य विकून संसाराला हातभार लावत होते. मात्र यावर्षीही त्यांचे नुकसान झाले असून अनेकांनी हा व्यवसायही बंद केला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीचे अनेक साहित्य यावर्षी विक्रीसाठी काढण्यात आले आहे.
बाॅक्स
प्राण्यांना रंग लावू नका
होळी साजरी करताना काही जण मुके प्राणी, जनावरांच्या अंगावर रंग फेकतात. अनेकवेळा त्यांना रंगविल्या जाते. मात्र असे करू नका. यामुळे त्यांना त्वचारोग, जखमा, आंधळेपणा, केस खराब होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे या प्राण्यांना कोणताही रंग लावू नका, असे आवाहन येथील प्यार फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.