छ. संभाजीनगरच्या पीडिताच्या किडनीचा ५ लाखांत सौदा; एसआयटीच्या तपासात खळबळजनक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:24 IST2026-02-20T14:22:42+5:302026-02-20T14:24:13+5:30
Chandrapur : नागभीड येथील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणानंतर पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी कंबर कसली आहे.

Ch. Sambhajinagar victim's kidney sold for Rs 5 lakh; SIT investigation reveals shocking information
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड येथील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणानंतर पोलिसांनी आंतरराज्य रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष तपास पथकाने आता छत्रपती संभाजीनगर येथील एका पीडिताची ओळख पटवली असून, त्याने केवळ पाच लाख रुपयांसाठी आपली किडनी विकल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, या पीडिताची शस्त्रक्रियाही तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये झाल्याचे बयाणात सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील हा पीडित तरुण कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. त्याची ही हतबलता ओळखून रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉ. क्रिष्णा याने त्याला गाठले. अवघ्या पाच लाखांच्या आमिषाला बळी पडलेल्या या तरुणाला डॉ. क्रिष्णाने किडनी विक्री करण्यास भाग पाडल्याचे तपासात पुढे आले आहे.
तपासाला मोठी गती
एकामागून एक पीडित समोर येत असल्याने एसआयटीच्या तपासाला मोठी गती मिळाली आहे. त्रिची येथील हॉस्पिटलमधील कागदपत्रे आणि तेथील संशयास्पद शस्त्रक्रियांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. क्रिष्णा याने आणखी किती तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
डॉ. सिंग व गोंविदसामीच केली शस्त्रक्रिया
पीडिताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याला चंद्रपुरात पाचारण करून त्याचे सविस्तर बयाण नोंदवले. यावेळी त्याच्याकडून त्रिची येथील रुग्णालयातील धक्कादायक बाबी पुढे आल्या. डॉ. रवींद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्नम गोंविदसामी या दोघांनीच माझी शस्त्रक्रिया करून किडनी काढली, ही बाब त्याने पोलिसांना सांगितली. यामुळे या रॅकेटमध्ये डॉक्टरांच्या मोठ्या साखळीचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कर्जाच्या विळख्यात अडकलेले 'लक्ष्य'
डॉ. क्रिष्णा प्रामुख्याने कर्जबाजारी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना आपले लक्ष्य करत होता. पीडितालाही कर्जातून मुक्त होण्यासाठी पैशांची गरज होती, अशांचाच फायदा या रॅकेटने घेतला.