साधनाच्या प्रेमात बादलने आणले तुफान ! प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराकडून काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:06 IST2025-11-18T17:04:50+5:302025-11-18T17:06:41+5:30
Chandrapur : सन २०२२ पासून नितेश हा गडचांदूर येथे आपल्या पत्नी व मुलीसह किरायाने राहत होता. याच दरम्यान बादल सोनी नामक व्यक्तीशी नितेशच्या पत्नीचे प्रेम जुळले होते.

Badal brings storm in Sadhana's love! Wife's lover removes Husband from love affair
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकराने हत्या केल्याची घटना रविवार, दि. १६ रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा येथील एका नाल्याजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. नितेश रामदास वाटेकर (रा. नारंडा) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी बादल सोनी व त्याचा सहकारी तुषार येनगंटीवार (रा. गडचांदूर) या दोघांना अटक केली आहे.
सन २०२२ पासून नितेश हा गडचांदूर येथे आपल्या पत्नी व मुलीसह किरायाने राहत होता. याच दरम्यान बादल सोनी नामक व्यक्तीशी नितेशच्या पत्नीचे प्रेम जुळले होते. गणपती उत्सवादरम्यान यामुळेच नितेश आणि बादल यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी बादलने नितेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. नितेशची पत्नी साधना ही गडचांदूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. त्यावेळी बादलने माफी मागितल्याने व पुढे त्रास देऊ नको असे साधनाच्या भावाने समजाविल्यानंतर वादावर पडदा पडला होता. मात्र त्या दोघांच्या भेटीगाठीत तो अडसर ठरत असल्याने बादलने नितेशचा काटा काढण्याचा कट रचला.
रविवारी वनसडी येथे बादलने एका मित्रासमवेत दारू घेतली. नितेश घरी परतणाऱ्या वाटेवर तो दबा धरून बसला होता. तो परत येताना दिसताच वाटेतच त्याच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यानंतर त्याचा गळा आवळला. यामुळे तो गंभीर जखमी होऊन मृत पावला. याप्रकरणी कोरपना पोलिसात तक्रार दाखल होताच ठाणेदार लता वाडीवे यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून आरोपी बादल सोनी व त्याचा सहकारी तुषार येणगंटीवार यांना अटक केली. त्यांच्यावर बीएनएस २०२३ कलम १०३ (१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
अशी आली हत्येची घटना उघडकीस
नितेशचे वनसडी येथे हेअर सलूनचे दुकान आहे. तो आपल्या दुचाकीने आपल्या स्वगावी नारंडा येथे अपडाऊन करत असायचा. रविवारी रात्री ९ वाजूनही तो घरी परतला नाही. याच दरम्यान गावातील काहींनी व्यक्तींनी नारंडा येथील खडक्या नाल्याजवळ दुचाकीसह नितेश पडून असल्याची माहिती मिळाली. यावरून त्याचा भाऊ सतीश यांनी जाऊन पाहिले असता. त्याच्या डोक्याला गंभीर मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे नेले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले.