30 वर्षांनंतर सोयाबीनने गाठला साडेसात हजार रुपयांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST2022-02-25T05:00:00+5:302022-02-25T05:00:27+5:30
यंदा सोयाबीन कापणी केली असतानाच पावसाचे विघ्न आले. त्यामुळे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल झाले. सोयाबीन कापणी केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा दिवस सारखा पाऊस बरसत राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसामुळे खराब झाले. त्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सोयाबीन घरी आणायला मिळेल की शेतातच मातीमोल होईल, अशी चिंता सतावत होती. आणि शेवटी होत्याचे नव्हते झालेच. पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले.

30 वर्षांनंतर सोयाबीनने गाठला साडेसात हजार रुपयांचा टप्पा
प्रकाश काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. एकीकडे उत्पादन कमी असताना कापणीस आलेल्या सोयाबीनला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हाती येणारे सोयाबीन मातीमोल झाले. सोयाबीनचे उत्पादन कमी आणि दरही कमी, अशी विपरीत परिस्थिती असताना अचानक सोयाबीनच्या दरात तेजी झाल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोनेही चकाकले. गुरुवारी सोयाबीनच्या दरात वाढ होऊन सोयाबीनने ३० वर्षांनंतर प्रथमच साडेसात हजार रुपये क्विंटलचा टप्पा गाठला आहे.
यंदा सोयाबीन कापणी केली असतानाच पावसाचे विघ्न आले. त्यामुळे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल झाले. सोयाबीन कापणी केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा दिवस सारखा पाऊस बरसत राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसामुळे खराब झाले. त्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सोयाबीन घरी आणायला मिळेल की शेतातच मातीमोल होईल, अशी चिंता सतावत होती. आणि शेवटी होत्याचे नव्हते झालेच. पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. त्यातही सोयाबीनला मोठा फटका बसला. त्यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला होता. यंदाही नेहमीप्रमाणे निसर्गाने शेतकऱ्यांना साथ देण्याऐवजी पाठ फिरवली.
तीन-चार महिन्यांत होणारे नगदी पीक
सोयाबीन हे तीन-चार महिन्यांत होणारे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. मात्र यंदाही सोयाबीन अस्मानी संकटात सापडले. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मात्र अचानक ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच पिवळे सोने समजल्या जाणाऱ्या सोयाबीनने चंद्रपूर जिल्ह्याच्या खासगी बाजारपेठेत गुरुवारी साडेसात हजार रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.