किडनी रॅकेट प्रकरणी तामिळनाडूच्या एका मंत्र्यांचे नाव; 'ओ' रक्तगटाच्या व्यक्तीला करायचे टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:23 IST2026-01-02T13:22:53+5:302026-01-02T13:23:43+5:30
Chandrapur : किडनी विक्रीत तरबेज झालेल्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचे 'युनिव्हर्सल डोनर' म्हणून 'ओ' रक्तगटाची व्यक्तीच पहिले टार्गेट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

A Tamil Nadu minister's name in kidney racket case; 'O' blood group person to be targeted
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : किडनी विक्रीत तरबेज झालेल्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचे 'युनिव्हर्सल डोनर' म्हणून 'ओ' रक्तगटाची व्यक्तीच पहिले टार्गेट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररीत्या डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी, दिल्लीचे डॉ. रवींद्रपाल सिंग हे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायचे. भूलतज्ज्ञ व अन्य एक डॉक्टर सहकार्य करायचा. कोरोनानंतर स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाचा खरा गोरखधंदा सुरू झाला. हिमांशू भारद्वाजचीसुद्धा किडनी याच हॉस्पिटलमध्ये जुलै २०२४ मध्ये काढण्यात आली. पोलिसांच्या लेखी या संपूर्ण रॅकेटचा खरा सूत्रधार सोलापूरचा रामकृष्ण सुंचू म्हणजेच डॉ. कृष्णाच आहे. त्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह विविध राज्यांत एजंटांचे जाळे उभारले होते. त्याच्या माध्यमातून येथे जवळपास ७० जणांच्या किडनी काढल्या आहे. यामागील कोट्यवधींच्या व्यवहाराचा तपास पोलिस पथक करीत आहे.
आठ हजार पानांचा कॉल व चॅटिंग डेटा
डॉ. कृष्णाचे मोबाइल कॉल डिटेल्स रेकॉईस (सीडीआर) तपासले असता सुमारे आठ हजार पानांचा कॉल व चॅटिंग डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे. यातूनच डॉ. कृष्णा हा डॉ. राजरत्नम आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या सतत संपर्कात असल्याचे उघड झाले.
बनावट आधारकार्डचा आधार
तामिळनाडूत केलेल्या शस्त्रक्रियेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचाही समावेश होता. डॉ. कृष्णाने बांगलादेशातही स्वतंत्र नेटवर्क उभारले होते. पीडितांना प्रथम पश्चिम बंगालमध्ये आणून बनावट आधारकार्ड तयार करून तामिळनाडूला शस्त्रक्रियेसाठी पाठवायचा. डॉ. राजरत्नमच्या आंतरराष्ट्रीय संबंधासह संपूर्ण रॅकेटचा बहुस्तरीय तपास पोलिस करीत आहे.
तो मंत्री कोण?
तामिळनाडू सरकारमधील एक मंत्री डॉ. राजरत्नम गोविंदस्वामीचा नातेवाईक आहे. त्या मंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे तिरुची किडनी तस्करीत नाव पुढे येऊनही कारवाई होऊ शकली नाही. परिणामी, डॉ. गोविंदस्वामी फरार झाला.