जिथे पसरविली दहशत, तिथेच केला त्याचा 'गेम'; चंद्रपुरातील थरारक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 16:54 IST2022-02-21T13:39:53+5:302022-02-21T16:54:44+5:30
चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते.

जिथे पसरविली दहशत, तिथेच केला त्याचा 'गेम'; चंद्रपुरातील थरारक घटना
चंद्रपूर : हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीला युवकाची त्याच ठिकाणी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
कादीर शेख (२५) रा. घुग्घूस असे मृताचे नाव असून त्याला खून प्रकरणात अटक झाली होती. नुकताच जामिनावर सुटून तो घरी आला होता. हत्या करणारे पाच-सहा आरोपी असल्याची माहिती आहे. नकोडा गावचे तत्कालीन उपसरपंच आरिफ हनीफ मोहम्मद यांचा ३ एप्रिल २०१६ मध्ये खून झाला होता. या प्रकरणात कादीर शेख याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच होता.
चार दिवसांपूर्वी जामिनावर तो बाहेर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कादीर शेख याने बँक ऑफ इंडिया चौक परिसरात तलवार घेऊन दहशत पसरविणे सुरू केले होते. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच-सहा युवकांनी त्याच परिसरात आलेल्या कादीर शेख याची धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार करून हत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
सर्व आरोपी घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. संतप्त लोकांनी घटनास्थळी असलेले चारचाकी वाहन जाळून टाकले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनीही घटनस्थळाला भेट दिली व माहिती जाणून घेतली.
त्या परिसरातील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फूटेजवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दंगा नियंत्रण पथक व पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. २०१६ मध्ये झालेल्या त्या खून प्रकरणाशी हे हत्याकांड जुळले असल्याचे काही नागरिक खासगीत म्हणताना दिसत आहेत.