ताडोबात फुलू लागले वाघांचे कुटुंब; विरा वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:32 AM2023-05-30T11:32:50+5:302023-05-30T11:34:56+5:30

पर्यटकांसाठी खुशखबर : गोंडमोहाळी-पळसगाव वनक्षेत्रात संचार असल्याची चर्चा

A family of tigers flourished in Tadoba; Veera tigress gave birth to two cubs | ताडोबात फुलू लागले वाघांचे कुटुंब; विरा वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

ताडोबात फुलू लागले वाघांचे कुटुंब; विरा वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

googlenewsNext

विकास खोब्रागडे

पळसगाव (पिपर्डा) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव बफर झोन अंतर्गत बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या विरा नामक वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ताडोबात आता वाघांचे कुटुंब चांगलेच फुलू लागल्याची चर्चा परिसरातील नागरिक व पर्यटकांमध्ये सुरू झाली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या १८० असल्याची माहिती येथील गाईड देतात. बेलारा गोंडमोहाळी-पळसगाव जंगलात वाघांचा सतत संचार असतो. याच जंगलात विरा नावाची वाघीण संचार करत असल्याचे अनेक पर्यटकांनी पाहिले. पर्यटकांना नेहमी दर्शन देणारी ही विरा वाघीण झुनाबाई आणि कंमकाझरी यांची कन्या असल्याचे सांगितले जाते. विराने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला. झायलो नामक रूबाबदार वाघ त्या बछड्यांचा पिता असल्याची माहिती सूत्राने दिली. दोन बछड्यांचा जन्म झाला असल्याचे शुभसंकेत आहेत. विरा वाघीण नेहमी गोंडमोहाळी-पळसगाव परिसरात वावरायची. पळसगाव पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना ही वाघीण आपल्या दीड ते दोन महिन्यांच्या दोन बछड्यांसह दर्शन देत आहे.

खऱ्या अर्थाने वाघांचे माहेरघर

एक बछड्या तिच्या पाठीवर बसून मस्त खेळत आहे. तर एक दिमाखात समोर बघत आहे. आनंदाची बाब म्हणजे तिचा बछडा एक मादी आणि एक नर असल्याचे माहिती आहे. ही वंशवेल मागील सहा वर्षांतील असल्याचे समजते. व्याघ्र संवर्धनाच्या अनुषंगाने ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे. चंद्रपूर जिल्हा आता खऱ्या अर्थाने वाघांचे माहेरघर झाले असून, ताडोबातील वाघांची संख्या वाढण्याचा शुभसंकेत आहे.

सध्या विरा ही वाघीण आपल्या बछड्यांसह पर्यटकांना दिसत आहे. या वाघिणीसोबत दोन बछडेसुद्धा आहेत. बछड्यांना जन्म दिल्याची ही आनंदाची घटना आहे. बछड्यांना जन्म दिल्यानंतर ती बाहेर येऊन साधारणत: आठ दिवस झाले असावेत.

- योगिता आत्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, पळसगाव (बफर)

Web Title: A family of tigers flourished in Tadoba; Veera tigress gave birth to two cubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.