त्याच्या अंगात हैवान संचारला आणि गर्भवती पत्नीची केली गळा आवळून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:46 IST2026-01-13T12:45:23+5:302026-01-13T12:46:05+5:30
Chandrapur : या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, हेमंत पवार, कोमल घाडगे आदींचे पथक चुनाळ्यात दाखल झाले.

A beast entered his body and strangled his pregnant wife to death.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (चंद्रपूर) : अंगात हैवान संचारलेल्या मद्यपी पतीने घरगुती वादातून गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या केली. ही खळबळजनक घटना चुनाळा येथे रविवारी (दि. ११) मध्यरात्री घडली. रोशनी उईके (२५) असे मृत पत्नीचे नाव आहे. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी रात्रीच आरोपी पती रविशंकर उईके (रा. इटारसी, मध्य प्रदेश) याला अटक केली.
आरोपी रविशंकर उईके याचा चार वर्षांपूर्वी इटारसी येथील रोशनीसोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाची एक मुलगी आहे. रोजगारासाठी दोन वर्षापासून तो कुटुंबासह चुनाळा येथे राहात होता. येथे त्याला जेसीबी चालक म्हणून काम मिळाले. याचदरम्यान, दारूचे व्यसन जडल्याने रविशंकर हा रोशनीसोबत वाद घालू लागला. यावेळी प्रतिकार केल्यास तो मारहाण करायचा. रविवारी (दि. ११) घटनेच्या रात्री त्याने दारूच्या नशेत वाद घातला. वाद विकोपाला गेला आणि त्याने रोशनीची गळा आवळून हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, हेमंत पवार, कोमल घाडगे आदींचे पथक चुनाळ्यात दाखल झाले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. मद्यपी पतीने गर्भवती पत्नीची हत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तीन वर्षांची चिमुकली झाली पोरकी
आरोपी रविशंकर उईके याच्यासोबत इटारसी येथून काही कुटुंबीय चुनाळा येथे आले होते. मात्र, काही दिवसांनंतर ते परत गेले. उईके कुटुंबाचे चुनाळा गावात कोणतेही नातेवाईक नसल्याची माहिती पुढे आली आहे. मद्याच्या नशेत रविशंकरने रोशनीची हत्या केल्याने त्यांची तीन वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेनंतर राजुरा पोलिसांनी इटारसी येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. मृत रोशनीचे वडील राजू शर्मा हे सोमवारी (दि. १२) सायंकाळी इटारसी येथून चुनाळा येथे दाखल झाले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली नव्हती.
आत्महत्या केल्याचा बनाव
रोशनीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा संदेश पती रविशंकर उईके याने रोशनीच्या कुटुंबीयांना दिला होता. या संदेशानंतर कुटुंबीयांनी घरमालकाशी संपर्क साधून नेमकी परिस्थिती काय आहे, याची विचारणा केली. घरमालकाने घरी जाऊन पाहणी केली असता, रोशनीच्या मृतदेहाजवळ रविशंकर बसलेला आढळून आला. त्यानंतर घरमालकाने डायल ११२ वर फोन करून घटनेची माहिती दिली. प्राथमिक चौकशीत रविशंकरने पोलिसांनाही रोशनीने आत्महत्या केल्याचेच सांगितले. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती व काही संशयास्पद बाबींमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर करण्यात आलेल्या कसून चौकशीत रोशनीची हत्या झाल्याचे उघड झाले. मृत रोशनीचे कुटुंबीय सोमवारी राजुरा येथे आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून आरोपी रविशंकर उईके याला अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी 'लोकमत'ला दिली.