पाच मजूर गंभीर : वांद्रा येथील रोजगार हमीच्या कामावरील घटना गांगलवाडी : मधमाश्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात रोजगार हमी योजनेच्या कामावरील ५० हून अधिक मजूर व रोजगार सेविका जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा गावालगतच्या नाल्यावर घडली. यातील पाच मजूर गंभीर जखमी असून मजुरांमध्ये दहशत पसरली आहे.वांद्रा ग्रामपंचायतीच्या वतीने रोजगाार हमी योजनेर्तंगत नाला खोलीकरणाचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले. कामावर महिला पुरुष असे ४०० च्यावर मजूर कार्यरत होते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास कामाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर १० वाजताच्या सुमारास परिसरात असलेल्या मधमाश्यांनी अचानक मजुरांवर हल्ला केला. त्यामुळे पळापळ सुरू झाली. १५ ते २० मिनीट पळापळ सुरू होती. घटनेची माहिती मिळताच सरपंच रंजना राऊत, उपसरपंच बाबुराव सातपुते यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मजुरांना सुरक्षितस्थळी हलविले. आरोग्य विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यामुळे मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. रुग्णवाहिकेद्वारे गंभीर जखमी असलेले मीरा आंबोरकर, रवींद्र भोयर, पुष्पा आंबोरकर, लिला मेश्राम, रोजगार सेविका भूमिका सातपुते यांच्यासह अन्य २१ जखमींना उपचारासाठी आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. किरकोळ जखमींवर वांद्रा येथील आरोग्य उपकेंद्रात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)
मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० मजूर जखमी
By admin | Updated: February 27, 2016 01:19 IST