बल्लारपुरातून पळवलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री! तेलंगणाच्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या
By परिमल डोहणे | Updated: March 1, 2026 18:53 IST2026-03-01T18:51:02+5:302026-03-01T18:53:37+5:30
अन्य दोन जणांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

बल्लारपुरातून पळवलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची साडेतीन लाखांत विक्री! तेलंगणाच्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या
परिमल डोहणे, चंद्रपूर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरातून आई-वडिलांच्या कुशीतून पळवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा चंद्रपूर पोलिसांना अवघ्या २० तासांत शोध लावला. या चिमुकल्याला तेलंगणातील एका टोळीने साडेतीन लाखांत विकले होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेच्या आधारे तेलंगणातील मंचेरियल गाठून पाच महिलांना अटक करून चिमुकल्याला पालकांच्या स्वाधीन केले. ऐलक्का बुद्दे (६०), राणी पसनोटी (३०), संगीता पानंगणती (४०), सर्व राहणार मंचेरियल, रा. तेलंगणा, सातक्का चंद्रया करेरे (५०), लावण्या कुमारस्वामी कोणा (३४) रा. मंथनी, मंचेरियल असे अटकेतील आरोपी महिलांची नावे आहेत. अन्य दोन जणांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात कचरा वेचून उदरनिर्वाह करणारी एक महिला २७ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या पटांगणात झोपली होती. रात्रीच्या गाढ झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. २८ फेब्रुवारीला सकाळी ही बाब लक्षात येताच बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि बल्लारपूर पोलिसांची सात पथके तत्काळ रवाना केली.
शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी
तक्रार येताच पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यादरम्यान काही संशयास्पद हालचाली दिसल्या. दरम्यान, एका चारचाकीने मुलाला घेऊन मंचेरियलला गेल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी मंचेरियल गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून पाचही महिलांना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, परीविक्षाधिन सहा. पोलिस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पीआय अमोल काचोरे, बल्लारपूरचे पीआय बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात एपीआय दीपक कांकेडवार, एपीआय बलराम झाडोकार, पीएसआय अभिषेक जंगमवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांनी केली. या टोळीने आणखी किती मुलांचे अपहरण केले आहे, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
रात्रभर ठेवली होती पाळत
तेलंगणातील ऐलक्का बुद्दे , राणी पसनोटी, संगीता पानंगणती या महिलांनी दोन पुरुष साथीदारांसह रेल्वेस्थानकावर असलेल्या त्या मुलाच्या आई-वडिलांवर पाळत ठेवली होती. मध्यरात्री ते गाढ झोपेत असताना संधी साधून त्या मुलाचे अपहरण करून मंचेरियल गाठले. तिथे सातक्का करेरे आणि लावण्या कोणा या महिलांना ३ लाख ५० हजार रुपयांत विक्री केली.