लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, मिरवणुका, पदयात्रा आणि मतदारांशी थेट जनसंपर्कातून उमेदवार आपली ताकद दाखवू पाहत आहेत. या गदारोळातच उमेदवारांच्या शिक्षणाविषयीची माहिती समोर आली असून, त्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या शिक्षण व संपत्तीच्या तपशीलानुसार, निवडणूक रिंगणात असलेल्या ४५१ उमेदवारांपैकी तब्बल तीन उमेदवार निरक्षर असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत २२ इंजिनिअर, एक डॉक्टर, एक पीएचडीधारक आणि आठ वकीलही आपले नशीब आजमावत आहेत.
महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, यंदा उमेदवारांची शैक्षणिक पातळी मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण असल्याचे चित्र आहे. दहावी-बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या संख्येने असून, केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेले तब्बल ४७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी शिकलेल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक उमेदवार दुसरी नापास, तर चार उमेदवार केवळ तिसरीपर्यतच शिक्षण घेतलेले आहेत.
शहराच्या विकासाचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी असताना, लोकप्रतिनिधींच्या शिक्षणावरूनही मतदारांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. शिक्षण महत्त्वाचे की अनुभव, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून, विकासासोबत लोकप्रतिनिधींना शिक्षित करणेही तेवढेच गरजेचे असल्याचे मत काही नागरिक व्यक्त करत आहेत.
शिक्षण कमी, पण अनुभव दांडगा
निवडणूक रिंगणातील काही उमेदवारांचे औपचारिक शिक्षण कमी असले, तरी त्यांचा महापालिकेतील अनुभव मोठा आहे. काही माजी नगरसेवकांनी शिक्षितांनाही लाजवेल अशी विकासकामे केल्याची उदाहरणे दिली जात आहेत.
या प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार निरक्षर
एकोरी प्रभाग क्रमांक १०, इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग क्रमांक ६, भानापेठ प्रभाग क्रमांक ११.
१०वी, १२वी शिकलेले अनेक उमेदवार
दहावी व बारावी पास तसेच नापास असलेले अनेक उमेदवार यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. मध्यम शिक्षण घेतलेले उमेदवार संख्येने अधिक असल्याचे चित्र आहे.
शैक्षणिक पात्रतेचे चित्रइंजिनिअर - २२डॉक्टर - १पीएच.डी. - १वकील - ८निरक्षर - ३
Web Summary : Chandrapur's election sees diverse candidates, including engineers, lawyers, and surprisingly, three illiterate individuals. Voters debate the importance of education versus experience for representatives.
Web Summary : चंद्रपुर चुनाव में इंजीनियरों, वकीलों समेत विभिन्न उम्मीदवार हैं, जिनमें तीन निरक्षर भी शामिल हैं। मतदाता प्रतिनिधियों के लिए शिक्षा बनाम अनुभव के महत्व पर बहस कर रहे हैं।