दिवसाढवळ्या अपहरण करून कंत्राटदाराकडून उकळली १८.५० लाखांची खंडणी, बंदुकीच्या धाकावर ठेवले ओलित
By परिमल डोहणे | Updated: December 26, 2025 20:39 IST2025-12-26T20:39:04+5:302025-12-26T20:39:09+5:30
Chandrapur News: बंदुकीच्या धाकावर सिव्हिल कंत्राटदाराचे अपहरण करून तब्बल १८ लाख ५० लाखाची खंडणी उकडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

दिवसाढवळ्या अपहरण करून कंत्राटदाराकडून उकळली १८.५० लाखांची खंडणी, बंदुकीच्या धाकावर ठेवले ओलित
- परिमल डोहणे
चंद्रपूर - बंदुकीच्या धाकावर सिव्हिल कंत्राटदाराचे अपहरण करून तब्बल १८ लाख ५० लाखाची खंडणी उकडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
राजुरा येथील सिव्हिल कंत्राटदार शैलेश काहीलकर (४५) हे गुरूवार दि. २६ डिसेंबर रोजी आपली कार सर्व्हिसिंगसाठी मोरवा येथील शोरूममध्ये गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून भेटायचे आहे, कुठे भेटू?” अशी विचारणा केली. आपण चंद्रपूर येथील शोरूममध्ये असल्याचे काहीलकर यांनी सांगितले. ४.३० वाजताच्या दरम्यान दोघेजण तेथे पोहोचले. काहीलकर यांना विश्वासात घेत गाडीत बसण्यास सांगितले.
यानंतर काही अंतरावर जाताच दोघांनी अचानक बंदूक काढत काहीलकर यांच्यावर रोखली आणि पैशांची मागणी केली. घाबरालेल्या अवस्थेत काहीलकर यांनी आपल्याकडे सध्या पैसे नसल्याचे सांगितले. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत मारण्याची धमकी दिली. काहीलकर यांना मध्यरात्री घरी घेऊन गेले. भीतीपोटी काहीलकर यांनी १८ लाख ५० हजार रुपये दिल्यानंतर ते पसार झाले. घाबरलेल्या अवस्थेत काहीलकर यांनी गुरुवारी राजुरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. मात्र, ही घटना पडोली पोलीस ठाणे हद्दीत येत असल्याने येथे प्रकरण पुढील तपासासाठी पडोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. वृत्तलिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, दिवसाढवळ्या व घडलेल्या या खंडणीच्या प्रकारामुळे चंद्रपूर-राजुरा परिसरात खळबळ उडाली आहे.
मध्यरात्रीपर्यंत बंदुकीच्या धाकावर गाडीत ठेवले ओलित
आपल्याजवळ पैसे नसल्याचे काहीलकर यांनी अपहरणकर्त्यांना सांगितले. मात्र त्यांनी दुपारी पाच वाजतापासून मध्यरात्रि १२.३० पर्यंत बंदुकीच्या धाकावर ओलित ठेवत संपूर्ण चंद्रपूर शहर फिरवले. पुढे जंगल परिसरात नेऊन गंभीर धमक्या देत दहशत निर्माण केली. “आत्ता पैसे नाहीत,” अशी असमर्थता पुन्हा व्यक्त केल्यावर आरोपींनी थेट घरून पैसे आणण्याचा आदेश दिला. भयभीत होऊन काहीलकर यांनी घरून नेऊन मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास १८ लाखांची रोकड दिली.
थरार बघून पत्नीला मानसिक धक्का
मध्यरात्री बंदुकीच्या धाकात दोघे नवऱ्याला घेऊन घरी आले. एवढेच नाही तर घरातील संपूर्ण रोकड घेऊन लंपास झाले. हा थरार बघून काहीलकर यांची पत्नी प्रचंड घाबरली.
या थरारक घटनेचा मानसिक धक्का बसल्याने काहीलकर यांच्या पत्नीची प्रकृती बिघडली. गुरुवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.