राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांतील मदत पॅकेजमध्ये चंद्रपूरमधील १४ तालुक्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:07 IST2025-10-11T19:05:15+5:302025-10-11T19:07:59+5:30
Chandrapur : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली माहिती

14 talukas of Chandrapur included in the relief package for heavy rain-affected districts of the state
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी काँग्रेसने नागपूर-चंद्रपूर महामार्गावर 'चक्काजाम' आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पूरबाधित म्हणून घोषित केले. यामध्ये जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. १०) दिली.
भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप करत काँग्रेसने आंदोलन केले होते. ओला दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. आंदोलनाची दखल घेऊन ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी केला. त्यानुसार सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोंभुर्णा व ब्रह्मपुरी या १४ तालुक्यांचा समावेश केला.
मुख्यमंत्र्यांचा मूल तालुका वंचित
शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेज यादीतून मुख्यमंत्र्यांचा मूल तालुका वगळण्यात आला. या तालुक्यातही अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवून पक्षपात करण्यात आला, असा आरोप खासदार धानोरकर यांनी केला आहे.