Two killed in overturned passenger car accident | भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोनजणांचा मृत्यू 
भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोनजणांचा मृत्यू 

ठळक मुद्देमृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या  पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.ग्रामीण पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती.

खामगाव - भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोघे जण जागीच ठार  तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी खामगाव- चिखली रोडवरील अत्रंज फाट्या नजीक घडली. मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या  पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.
औरंगाबाद येथील शिक्षक सेनेचे पदाधिकारी असलेले हरि बारकू सोनवणे (५५),  सूर्यभान कानू गोरे(४०), सौ. कांताबाई हरिभाऊ सोनवणे, सुनंदा कानू गोरे (रा. औरंगाबाद) आणि राजेंद्र भिकनदास  वैष्णव (३५) रा. हसनाबाद ता. भोकरदन जि. औरंगाबाद एमएच २२ यू- ३२४६  याक्रमांकाच्या प्रवासी कारने खामगावकडे येत होते. दरम्यान, अंत्रज फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात कार मधील हरि बारकू सोनवणे आणि सूर्यभार कानू गोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये कांताबाई सोनवणे आणि सुनंदा कानू गोरे या महिलांसह राजेंद्र वैष्णव यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच काही स्थानिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना खामगाव येथील सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही अकोला येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ग्रामीण पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती.


Web Title: Two killed in overturned passenger car accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.