Thousands of plants burn to hide corruption in plantation! | कागदोपत्री लागवडीमुळेच पेटली वनीकरणाची हजारो झाडे!

कागदोपत्री लागवडीमुळेच पेटली वनीकरणाची हजारो झाडे!

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू  नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली.  याप्रकरणी पोलिसांचा पंचनामाही संबंधितांनी ‘मॅनेज’केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या शेगाव-खामगाव क्षेत्रावरील हजारो झाडे चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नांदुरा तालुक्यातही लक्षावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला. गत आठवड्यात नांदुरा सामाजिक वनीकरण विभागातंर्गत तालुक्यातील विविध क्षेत्रावर नाविण्यपूर्ण योजनेतून हजारो झाडे लावण्यात आली. मात्र, या झाडांची लागवड आणि देखभाल कागदोपत्री करीत लक्षावधी रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. रोपवाटीकेतही कागदोपत्रीच रोपं तयार झाली. कागदावरच ट्री-गार्डही खरेदीचा भ्रष्टाचार उघडकीस येत नाही तोच, मलकापूर तालुक्यातील धरणगाव क्षेत्रावरील साडे पाच हजार जाळण्यात आल्याची वस्तुस्थिती समोर आली. दरम्यान, एकाच रात्रीतून साडे पाच हजार जळाली तरी कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत असून, कागदोपत्री लावण्यात आलेली वृक्ष लागवड आणि देखभालीचे बिंग फुटू नये. यासाठी वृक्ष पेटविण्याचा बनाव रचण्यात आल्याची चर्चा आता सामाजिक वनीकरण विभागात रंगू लागली आहे. मलकापूर तालुक्यातील वृक्ष जळाल्याप्रकरणी अधिक माहितीसाठी वनक्षेत्रपाल एस.के.काळुसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.

 

साडेपाच हजार झाडे जाळल्याची तक्रार!

मलकापूर वन परिक्षेत्रातंर्गत धरणगाव शिवारातील गट क्रमांक १११ मधील साडेपाच हजार झाडं अज्ञातांनी जाळल्याची तक्रार वनरक्षक बोंबटकार यांनी  १९ जानेवारी रोजी केली. मलकापूर शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, एकाच रात्रीतून हजारो झाडे जळाली तरी कशी? असा संदिग्ध प्रश्न उपस्थित होत आहे.  दरम्यान, वरिष्ठांच्या दबावातून वनरक्षकांनी तक्रार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्याचे समजते.

 

पोलिस पंचनामा ‘मॅनेज’!

धरणगाव क्षेत्रावरील एका शेताजवळ धुरा जाळण्यात आल्याने  काही वृक्षांना आस लागली. यामध्ये काही वृक्ष जळाले. मात्र, प्रत्यक्षात साडेपाच हजार झाडं जाळण्यात आल्याचा पंचनामा पोलिसांनी केला. स्थळावरील वस्तुस्थिती आणि पंचनामा यामध्ये प्रचंड तफावत असल्याने, सामाजिक वनीकरणच्या अधिकाºयांनी पोलिसांनी संगनमत करून हा पंचनामा ‘मॅनेज’ केल्याची चर्चा आहे.


 

मलकापूर तालुक्यातील धरणगाव क्षेत्रावरील वृक्ष जाळल्या प्रकरणी संबंधितांकडून  पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. वृक्ष लागवड योजनेतंर्गत झालेल्या लागवडीची चौकशी केली जाईल.

- एस.ए.पारडीकर,

विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, बुलडाणा.

परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांकडून पंचनामा करण्यात येतो. यामध्ये पंच साक्षीदार असतात. तथापि, मलकापूर येथील एकाच रात्रीतून साडेपाच हजार जाळण्यात आलेल्या प्रकाराचा तपास सुरू असून, यामध्ये किंचितही संदिग्धता आढळून आल्यास निस्पक्ष चौकशी करण्याचे संबंधितांना सुचविले जाईल.

- गिरीश बोबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मलकापूर.

Web Title: Thousands of plants burn to hide corruption in plantation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.