‘है तयार हम’ म्हणत पोलिसांनी केली दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:25+5:302021-09-12T04:39:25+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सोबतच नागरिकांनी जास्त गर्दी करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ नये ...

‘है तयार हम’ म्हणत पोलिसांनी केली दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सोबतच नागरिकांनी जास्त गर्दी करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ नये हे टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके यांचाही यामध्ये समावेश होता.
या मार्गाने काढण्यात आला रुट मार्च
शहरातील शहर पोलीस स्टेशनपासून सुरू करण्यात आलेले पथसंचलन भोंडे सरकार चौक, कारंजा चौक, जनता चौका, परदेशी पुरा, जुना गाव, शिवाजी नगर, संगम चौक आणि जयस्तंभ चौकात या रुट मार्चची सांगता करण्यात आली.
जयस्तंभ चौकात करण्यात आली रंगीत तालीम
गणेशोत्सवात दंगा किंवा इतर अनुचित प्रकार घडल्यास ती परिस्थिती कशी हाताळायची यासाठी रुटमार्च नंतर जयस्तंभ चौकात राईट कंट्रोल ड्रीलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आणि शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी या ड्रीलमध्ये समाविष्ट एका आरसीपी पथक, एक क्यूआरटी पथक, सीआरपीचे प्लाटून आणि ५ पोलीस अधिकारी,६० पोलीस कर्मचारी, १५ होमगार्ड पुरुष आणि ५ महिला होमगार्ड यांना दंगा नियंत्रणाचे मार्गदर्शन केले.
शहरात किंवा परिसरात कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकारावर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. तेव्हा नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.
-रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलडाणा.