अहमदनगर येथे अडकलेल्या खामगावातील ५१ मजुरांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:27 IST2020-05-12T16:24:58+5:302020-05-12T16:27:10+5:30
अहमद नगर येथील एका ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसद्वारे हे कामगार दुपारी २.३० वाजता खामगावच्या दिशेने रवाना झालेत.

अहमदनगर येथे अडकलेल्या खामगावातील ५१ मजुरांना दिलासा!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना विषाणू संक्रमनामुळे अहमदनगर येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये अडकून पडलेल्या खामगावातील मजुरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खामगावातील ५१ मजूर अहमदनगर मध्ये अडकून पडल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत अडकलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासासाठी प्रयत्न करण्यात आले. हे येथे उल्लेखनिय!
खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमद नगर येथील दरेवाडी मिल्ट्री कॅम्प, एमआयडीसी गेट नं.३ परिसरात गत ४५ दिवसांपासून अडकून पडले होते. जवळची सर्वच संसाधने संपल्यानंतर ‘आम्हाला घरी पोहोचवा अशी आर्त हाक’ या मजूरांकडून दिली जात असतानाच, ‘लोकमत’ने ११ मे २०२० रोजीच्या अंकात पहिल्या पानावर ‘खामगाव तालुक्यातील ५१ मजूर अहमदनगरमध्ये अडकले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची लागलीच दखल घेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. जिल्हा प्रशासनाकडून अहमद नगर येथील तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या विशेष परवानगीने या मजुरांच्या घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला. अहमदनगरचे आमदार आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मजुरांना आपल्या गावी पाठविण्यासाठी महत्वाची मदत केली. मिल्ट्री कॅम्प परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच ५१ जणांची तपासणी पूर्ण केल्यानंतर अहमद नगर येथील एका ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसद्वारे हे कामगार दुपारी २.३० वाजता खामगावच्या दिशेने रवाना झालेत. खामगाव येथे आल्यानंतरही या मजुरांची उपजिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या मजुरांना स्वगृही सोडण्यात येईल. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक त्र्यंबक घुगरकर आणि खामगाव येथील प्रमोद महाजन यांची भूमिका याकामी महत्वाची ठरली.
उप जिल्हाधिकारी गौरी सावंत यांची भूमिका ठरली महत्वाची!
अहमद नगर येथे अडकून पडलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी संपर्क केल्यानंतर उपजिल्हाधिकारी सावंत यांनी जिल्हाधिकारी आणि अहमद नगर येथील प्रशासनाशी संपर्क केला. त्यानंतर २६ पुरूष १६ महिला आणि ५ बालकांचा गावी येण्याचा मार्ग मोकळा झाला.
सानंदांनी उचलला मजुरांच्या येण्याचा खर्च!
प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर अहमद नगर येथून खामगाव येथे या मजुरांना आणण्यासाठीचा संपूर्ण खर्च माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उचलला. मंगळवारी अहमदनगर येथील कदम ट्रॅव्हल्सच्या बसेच्या भाड्यासाठी ५५ हजार रूपयांचा भरणा केला. त्यानंतर या बसेस अहमदनगर येथून दुपारी २:३० वाजता खामगावच्या दिशेने निघाल्या आहेत.
अडकून पडलेल्या मजुरांना सहकार्य करण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, अहमदनगर येथे अडकून पडलेल्या मजुरांना स्वगृही आणण्यासाठी मदत केली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे खामगाव तालुक्यातील मजूर अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपण पुढील प्रयत्न केले.
- दिलीपकुमार सानंदा
माजी आमदार, खामगाव.