बुलडाणा: जून, जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांनी अधिक पडलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये जिल्ह्यावर कृपाछत्र न ठेवल्यामुळे पावसाची जिल्ह्यातील तूट पुन्हा १३ टक्क्यावर पोहोचली आहे. दरम्यान एकट्या ऑगस्ट महिन्याचा विचार करता तब्बल ३९ टक्के पाऊस कमी पडला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस बरसण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.
भारतीय हवामान खात्याने २ ऑगस्ट रोजी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाचा विस्तारीत अंदाज जाहीर केला होता. तो ऑगस्ट महिन्यात तंतोतंत खरा ठरला असून ऑगस्टमध्ये सरासरी पडणाऱ्या २०७.४ मिमी पावसाच्या तुलनेत अवघा १२६.८ मिमी पाऊसच जिल्ह्यात बरसला आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. ऑगस्टमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिल्याने खरीप हंगामावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये पाऊस कसा पडतो यावर खरीपासोबतच रब्बीचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे.
जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात पाऊस कमी पडल्यास ऑगस्टमध्ये हमखास दमदार पाऊस पडतो अशी पुर्वीपासूनची धारणा आहे. पण यावर्षी ती फोल ठरली. जवळपास तीन वर्षानंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या अवघा ६१ टक्केच पाऊस झाला आहे.
--१ ते ९ सप्टेंबर दरम्यान दमदार पाऊस--
दुसरीकडे हवामान विभागाने सप्टेंबरमधील विस्तारीत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार १ ते ९ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सरासरीपेक्षाही पाऊस अधिक पडले असे सांगण्यात आले आहे. ऑगस्टच्या उर्वरित चार दिवसामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ते मध्यमस्वरुपाचा तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हमखास दमदार पाऊस जिल्ह्यात पडेल असा अंदाज असल्याचे कृषी हवामान केंद्राचे हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे.
--प्रकल्पांमध्ये ४७ टक्केच जलसाठा--
जिल्ह्यातील ३ मोठ्या, सहा मध्यम व ८१ लघु प्रकल्पामध्येही क्षमतेच्या अवघा ४७ टक्केच जलसाठा आहे. बुलडाण्या सारख्या शहरालाही येत्या काळात दमदार पाऊस न पडल्यास डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे प्रकल्पातील जलपातळी वाढविण्यासाठी येत्या काळात दमदार पावसाची गरज आहेच.
--पाच तालुके प्रभावित-
कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुके प्रभावित झाले असून हे पाचही तालुके घाटाखालील भागातील आहे. जळगाव जामोद तालुक्या तर वार्षिक सरासरीच्या अवघा ३४ टक्के पाऊस झाला आहे. नांदुरा आणि मोताळा या दोन तालुक्यात किमान पक्षी ४७ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. शेगाव, मलकापूर या तालुक्यात ४५ टक्केही पाऊस झालेला नाही.
--तीन महिन्यात पडलेला पाऊस--
महिना पडणारा पाऊस प्रत्यक्ष पडलेला पाऊस टक्केवारी(-/ )
जून १३९.३ १३८.६ -०.५०
जुलै १९२.२ १९६.६ २.२९
ऑगस्ट २०७.४ १२६.८ -३८.८६