लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हय़ात २७९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली असून, थेट सरपंचाच्या निवडीमुळे प्रस्थापितांना हादरा बसला आहे. विजयी झालेल्या सरपंचांवर सर्वच पक्ष आता दावा सांगायला लागले आहेत.सोमवारी सकाळपासून प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालया त मतमोजनीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलसमोर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसजसे निकाल घोषित होत होते, कार्यकर्ते गुलाल उधळत आनंद साजरा करीत होते. तसेच काही गावांमध्ये मिरवणूकही काढण्यात आली. विविध पक्षांशी संबंधित उमेदवारांनी पक्ष कार्यालयात जाऊन भेटी दिल्या. थेट मतदारांमधून पहिल्यांदाच सरपंच पदाची निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मोठय़ा गावातील सरपंच पदाची निवडणूक अटीतटीची झाली. घाटाखाली भाजप व राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले तर घाटावर काँग्रेस व शिवसेनेला अपेक्षित जागा मिळाल्या. घाटावरील बुलडाणा तालुक्यात काँग्रेस, मोताळा तालुक्यात शिवसेना, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. घाटाखालील खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात भाजप, नांदुरा व शेगाव तालुक्यात काँग्रेसला यश मिळाले. तसेच अन्य तालुक्यांमध्ये संमिश्र उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही पक्षाच्या चिन्हाविना निवडणूक लढविण्यात आली; मात्र सरपंच विजयी झाल्यानंतर सर्वच पक्ष तो आपल्याच पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करीत आहे. जिल्हय़ात विजयी झालेले सरपंच व सदस्य आपल्याच पक्षाचे असून, पक्षाला यश मिळाल्याचा दावा सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे.
संग्रामपुरात भाजपची सरशी, नांदुरा, शेगावात काँग्रेस वरचढ: जळगाव जामोदमध्ये संमिश्र यशखामगाव: ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी हाती आलेल्या धक्कादायक निकालात खामगाव तालुक्यात सरपंच निवडणुकीत भाजपला झुकते माप मिळाले. त्याचवेळी नांदुरा आणि शेगाव तालुक्यात काँग्रेस वरचढ ठरली असून, मलकापूर येथे भाजप आणि राष्ट्रवादीचा समसमान असा दावा ठोकला असून, जळगाव जामोद तालुक्यात सरपंच पदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आपण नंबर एक असल्याचा दावा केला जात असला तरी, या ठिकाणी संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे. खामगाव मतदारसंघात भाजपला झुकते माप मिळाले असले तरी काही गावांच्या सरपंच पदावरून भाजप-काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, संग्राम पूर तालुक्यात भाजपची सरशी असली तरी ९ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने पेच निर्माण झाला आहे. निवडणूक निकालानंतर सोमवारी दिवसभर राजकीय घडामोडी वेगवान झाल्या होत्या. एकाच उमेदवाराचा दोन ठिकाणी सत्कार होण्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे सरपंच पदाचा उमदेवार नेमका कोणत्या पक्षाचा, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.
गत काळात केंद्रात व राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरीत त्यांच्यावर लादलेली महागाई व भाववाढ, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासत, नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी, यासारख्ये ग्रामीण जन तेला उद्ध्वस्त करणारे निर्णय, यामुळे ग्रामीण भागात भाज पाविषयी नाराजीचे वातावरण होते. - आ. राहुल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
थेट सरपंच पदामुळे रंगत वाढलेल्या निवडणुकीत भाजप सत्ताधार्यांविरोधात सूर आणि शिवसेनेच्या बाजूने भक्कम साथ दिसून आली. जिल्हय़ातील तेराही तालुक्यात शिवसेनेच्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांनी भरघोस मते मिळविली असून, सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे.- खा. प्रतापराव जाधव, शिवसेना
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. बुलडाणा जिल्हय़ात २७९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १२३ जागांवर भाज पने विजय मिळविला आहे. सर्वत्रच भाजपला चांगला प्रतिसाद मिळाला असून, मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे. - धृपदराव सावळे, जिल्हाध्यक्ष, भाजप
जिल्हय़ात जवळपास ७२ ते ७५ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात एकतर्फी निकाल आले असून, म तदारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसला पसंती दिली आहे. घाटाखाली मलकापूर तालुक्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, बहुतांश ठिकाणी विजय झाला. - नाझिर काझी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस