बुलढाण्यातली हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्थानकात नेले; मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकल्पाचे कंत्राट 'सॅम इंडिया' या कंपनीकडे असून, येथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर कार्यरत आहेत. २८ जानेवारी रोजी दुपारी परिसरात एकटी असलेल्या मुलीला आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५, रा. पलामू, झारखंड) याने फूस लावून जवळील झोपडीत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेत मुलीला गंभीर दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात न नेता थेट मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. दरम्यान, संध्याकाळी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात सतर्कता अलर्ट जारी केला.
बसस्थानके व रेल्वे स्थानकांत शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर रात्री मलकापूर रेल्वे स्थानकात आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस करीत आहेत.
पीडितेवर अकोल्यात उपचार सुरू!
पीडित मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र रक्तस्राव न थांबल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी मजुराकडे आधार कार्डही नाही!
या प्रकरणाच्या तपासात आरोपी मजुराकडे आधार कार्ड किंवा कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसल्याचे समोर आले असून, यामुळे कंत्राटदार कंपनीच्या कामगार व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदेशीर तरतुदीनुसार कामगाराची नोंदणी व ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
त्यांचे ओळखपत्र व पोलिस पडताळणी बंधनकारक आहे. कामगार विमा सुरक्षा देणेही गरजेचे आहे. या प्रकरणात कामगारांची पार्श्वभूमी तपासणी न केल्यास कंत्राटदारावरही प्रशासकीय व कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यादृष्टीने पोलिस आता कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.
Web Summary : A five-year-old girl was sexually assaulted by a migrant worker at a medical college construction site in Buldhana. The accused abducted her but was arrested by police at Malkapur railway station. The girl is receiving treatment in Akola. The contractor faces scrutiny for employing the worker without proper identification.
Web Summary : बुलढाणा में एक शासकीय मेडिकल कॉलेज के निर्माण स्थल पर एक प्रवासी मजदूर ने पांच वर्षीय बच्ची का यौन उत्पीड़न किया। आरोपी ने उसका अपहरण कर लिया, लेकिन पुलिस ने उसे मलकापुर रेलवे स्टेशन पर गिरफ्तार कर लिया। लड़की का अकोला में इलाज चल रहा है। ठेकेदार बिना पहचान के कर्मचारी रखने के लिए जांच के दायरे में।