Maharashtra flood: पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; ज्ञानगंगा, नळगंगा नदीत चौघे बुडाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:27 IST2025-09-29T15:19:20+5:302025-09-29T15:27:33+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि निमगाव तालुक्यात घडलेल्या दोन घटनांमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाला.

Maharashtra flood: पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; ज्ञानगंगा, नळगंगा नदीत चौघे बुडाले!
Buldhana News: निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत तसेच मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे नळगंगा-व्याघ्र नदीच्या संगमावर पोहोण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह दोन युवक २८ सप्टेंबर रोजी दुपारी नदीत बुडाले. यामध्ये दसरखेड येथील एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला असून, इतरांचा शोध बचाव पथकाकडून आहे.
निमगाव येथील करण गजेंद्र भोंबळे (१८) आणि वैभव ज्ञानेश्वर फुके (२५) हे दोघे पोहण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनास्थळी शोधमोहीम सुरू असून, पोहणाऱ्यांचे पथक सतत प्रयत्नशील आहे. या घटनेमुळे निमगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जयवंत सातव, निमगावचे सरपंच विकास इंगळे, पोलिस पाटील, तलाठी, ओमसाई फाउंडेशनचे सदस्य तसेच मानेगाव येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध लागलेला नव्हता.
दोघे बुडाले, पाण्यात न उतरल्याने तिघे वाचले
दरम्यान, दुसऱ्या घटनेत मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील पाच अल्पवयीन मुले रविवारी दुपारी सुमारास घराबाहेर पडली होती. ते सर्व केशोबा मंदिराजवळील बंधाऱ्यासमोर नळगंगा नदीतील डोहात पोहण्यासाठी गेले.
दुपारी साधारण १ वाजता शुभम राजेश दवंगे (१६) आणि सोहम उर्फ कांच्या वासुदेव सोनवणे (१५) यांनी पाण्यात उडी घेतली. त्यावेळी उर्वरित तिघे मुले बाहेरच थांबली होती; मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्याने शुभम व सोहम दोघेही बुडाले. हा प्रकार पाहताच इतर मुलांनी गावाकडे धाव घेतली. शोधमोहीम सुरू असताना शुभम दवंगे याचा मृतदेह सापडला.