अंतिम वर्षांच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेणे अशक्यच : परिचर्चेत उमटला सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 01:01 PM2020-08-31T13:01:40+5:302020-08-31T13:02:08+5:30

३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयारच नसल्याचा सूर लोकमतच्या आॅनलाईन परिचर्चेत उमटला.सूर

It is impossible to take final year exams till September 30! | अंतिम वर्षांच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेणे अशक्यच : परिचर्चेत उमटला सूर

अंतिम वर्षांच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेणे अशक्यच : परिचर्चेत उमटला सूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला असला तरी ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयारच नसल्याचा सूर लोकमतच्या आॅनलाईन परिचर्चेत उमटला.सूर
राज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याविषयी निर्णय दिल्याने राज्य सरकार, विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ती घ्यावीच लागणार आहे. ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयार नसल्याचे अनेक प्राचार्यांनी सांगितले. विदर्भासह राज्यातील अनेक भागातील विद्यार्थी पुणे, औरंगाबाद येथे शिक्षणासाठी गेलेले होते. कोरोनामुळे हे विद्यार्थी गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षा देण्यासाठी पुन्हा ही महानगरे गाठावी लागणार आहे. त्यामुळे, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेतल्यानंतर निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. या निधीची तरतूदही शासनाने करावी. फिजिकल डिस्टन्सीग ठेवून परीक्षा घेतल्यास अनेक महाविद्यालयांमध्ये खोल्या कमी पडणार आहे.


बुलडाणा जिल्ह्यात नेटवर्कची समस्या असल्याने आॅनलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सर्वच प्राचार्यांनी सांगितले. सहा महिन्यांचा कालावधी कमी करून थेट जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरू केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल,असेही काही प्राचार्यांनी सांगितले. या परिचर्चेचे संचालन प्रा.डॉ.बाळकृष्ण इंगळे यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अशक्य आहे. राज्य शासनाने केंद्र आणि युजीसीला विनंती करून नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये परीक्षा घेण्याची मुदत वाढवावी. अनेक महाविद्यालये कोविड सेंटर आहेत. निजंर्तुकीकरणासाठी लागणारा निधी शासनाने द्यावा. परीक्षा सप्टेंबरमध्येच घेतल्यास महाविद्यालये परिक्षा केंद्र कोरोनाची हॉटस्पॉट ठरतील.
-प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे, अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक आघाडी तथा व्यवस्थापन परिषद सदस्य सं.गा.बा.अ.विद्यापीठ

अंतिम वर्षाच्या परीक्षा या घ्याव्याच लागणार आहेत.फक्त त्यासाठी कालावधी वाढवून द्यावा लागेल. कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच असल्याने विद्यार्थ्यांच्या आणि परीक्षेमध्ये काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी प्रत्येक शिफ्टला वर्गखोल्यांचे करावे लागणारे सॅनिटायझेशन व इतर बाबींवर मोठा खर्च होणार आहे. त्याची प्रतिपूर्ती होणे आवश्यक आहे.
-डॉ.सुभाष गव्हाणे,
प्राचार्य,चिखली

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत. आॅनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. कोरोनामुळे वर्ग खोल्यांमध्ये घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांचे वितरण करून त्यांना घरूनच त्या लिहून आणायला सांगणे हा एक पर्याय ठरू शकतो. विद्यार्थ्यांकडून आलेल्या उत्तर पत्रिका गोळा करून विद्यापीठाकडे पाठवाव्यात. हा पर्याय होऊ शकतो.
-डॉ.विजय नागरे,
प्राचार्य, दुसरबीड

अंतिम वर्षांच्या परीक्षा आॅफलाईन किंवा आॅनलाईन घेणे ३० सप्टेंबरपर्यंत शक्य नाही. प्रवेश प्रक्रीया कोरोनामुळे रखडलेली असतानाच परीक्षा घेण्याचा निर्णय आला आहे. आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करून परीक्षा घेतल्यास वर्ग खोल्या कमी पडतील. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची गरज आहे.
-डॉ.अण्णासाहेब म्हळसणे
प्राचार्य, बुलडाणा


अंतिम वर्षांच्या परीक्षा दर्जेदारच झाल्या पाहिजे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त नसल्याने परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांना अडचणी येतील असे वाटत नाही. ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अशक्य आहे. सरकारने जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची गरज आहे. तसेच परीक्षा घेताना महाविद्यालयांना कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करताना कसरत करावी लागणार आहे.
-प्रा.डॉ.अनंत सिरसाट
बुलडाणा

 

Web Title: It is impossible to take final year exams till September 30!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.