"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:23 IST2025-09-28T15:20:15+5:302025-09-28T15:23:06+5:30
डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले.

"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
‘आररर... सरकार मायबाप… पांडुरंगा, आता कठीण झालं! आम्ही कसं जगायचं? आत्महत्या करू का?— अशा हताश आरोळ्यांनी राहेरी परिसरातील शेत थरारून गेले. शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावत कहर माजवला. डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले.
शेत जलमय, हिरवी स्वप्नं उद्ध्वस्त
अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस यांसारखी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. रात्रीच्या पावसाने शेतात मिनी तलावांचे स्वरूप घेतले आहे. एरवी हिरव्यागार पिकांनी डोलणारी शेती आज नुसती पाण्याने भरलेली खाचरे बनली आहे. शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
बळीराजाची हतबल हाक
आम्ही शेतकरी आता कस जगायचं? कर्ज, बी-बियाण्याचे पैसे, घरखर्च… सगळं कोलमडलंय. सरकार आमच्यासाठी काय करणार?”— अशी कळकळ समाधान गवई याने व्यक्त केली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून जनतेत संताप उसळला आहे. सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
‘सरकार मायबाप… आता कसं जगायचं?’
— Lokmat (@lokmat) September 28, 2025
अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा pic.twitter.com/KmIN037B19
संकटांची मालिका थांबेना
गेल्या काही आठवड्यांपासून सतत होत असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. उत्पादनाचे नुकसान, महागाई, कर्जफेडीची चिंता— या सर्वांनी शेतकरी नैराश्यात ढकलला आहे. राहेरी परिसरात रात्री दोन वाजता झालेल्या पावसाने शेतजमीन पूर्णपणे जलमय झाली.
बुलढाण्याचा भीषण हिशेब
--यंदा ९२ पैकी तब्बल ७१ मंडळांत अतिवृष्टी, तर १८ मंडळांत पाच वेळा आणि ४ मंडळांत सहा वेळा अतिवृष्टीची नोंद.
--७७ टक्के मंडळे अतिवृष्टीने ग्रासलेली
--२२ सप्टेंबरपर्यंत २ लाख ९६ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान.
--अवकाळी पावसासह ही संख्या ३ लाख ५ हजार हेक्टरपर्यंत.
--जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९२.९८% पाऊस आधीच.
--पाच तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली
हृदय हेलावणारे वास्तव
राहेरीत शेतात पाण्यात उभा राहून हंबरडा फोडणारा शेतकरी म्हणजे संपूर्ण बुलढाण्यातील बळीराजाची दाहक कहाणी आहे. ‘पिके गेली, स्वप्ने गेली… आता जगायचे कसे?’ हा प्रश्न केवळ राहेरीपुरता नाही; तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.