लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनावरील लस ही गर्भवतींसह स्तनदा मातांसाठीही सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे गर्भवतींसह स्तनदा मातांच्या लसीकरणासही देशात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लस घेण्यापूर्वी गर्भवतींसह स्तनदा मातांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही तज्ज्ञांकडून केले जात आहे.
कोविड प्रतिबंधक लस प्रभावी ठरत आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांनाही लस सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता गर्भवतींनाही कोविड प्रतिबंधक लस घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, डेल्टा प्लसच्या निमित्ताने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका लक्षात घेता गर्भवतींना ही लस सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. अशा परिस्थितीत गर्भवतींसह स्तनदा मातांच्या लसीकरणाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे.
लसीकरणामुळे गर्भवतींचे कोरोनापासून संरक्षण होण्यास मदत होईल. मात्र, गर्भवतींची प्रकृती ठीक नसेल, तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी.
- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा
सर्वांनी सहकार्य करावे
गरोदर मातांसाठी कोविड लसीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे. ही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आणि फायदेशीर बाब आहे. जिल्ह्यातील सर्व गरोदर आणि स्तनदा मातांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचेशी संपर्क साधावा.
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काळजी घ्यावी
गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर महिलांसाठी कोविडची लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गर्भवतींनीही घेणे गरजेचे आहे.
तसेच लस घेतल्यानंतर ताप आल्यास पॅरासिटामोल घेण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, कुठलेही औषध घेण्यापूर्वी गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असे आवाहनदेखील डॉक्टरांनी केले आहे.