डोणगाव (बुलडाणा): बोलेरो-कंटेनर अपघातात चार ठार झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील मेहकर तालुक्यातील अंजनी बु. नजीक रविवारी पहाटे चार वाजता घडली. या अपघाातील मृतक औरंगाबाद येथील आहेत. औरंगाबाद (खडकेश्वर) येथील क्षिरसागर कुटुंबिय नागपूर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. मुलीची भेट घेऊन मनोहर हरिभाऊ क्षिरसागर (६७), पत्नी नलीनी मनोहर क्षिरसागर (६५), मुलगी मेघा मनोहर क्षिरसागर (३१, सर्व खडकेश्वर, औरंगाबाद) व चालक गजानन नागरे (२४, रा. कन्नड, ता. औरंगाबाद) हे शनिवारी रात्री नागपूरवरून बोलेरो (क्रमांक एम-एच-२०- ई-ई- ६७४६) ने औरंगाबादकडे निघाले होते. दरम्यान, मेहकर तालुक्यातील अंजनी बु. नजीक रविवारी पाहाटे मेहकरकडून येणाºया कंटेनर (क्रमांक एम-एच- २६- ए-डी- ३५४१) ची व बोलेरोची समोरा-समोर जबर धडक झाली. या अपघातात बोलेरोमध्ये असलेले मनोहर हरिभाऊ क्षिरसागर, पत्नी नलीनी मनोहर क्षिरसागर, मुलगी मेघा मनोहर क्षिरसागर व चालक गजानन नागरे हे ठार झाले. या अघपाता बोलेरो या वाहनाचा चुराडा झाला आहे. अपघात घडताच काही वेळाने घटनास्थळावर परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. बॉक्स..... जेसीबीच्या साहाय्याने काढले बाहेर डोणगाव पोलीस स्टेशनचे एएसआय अशोक नरोटे व अंभोरे हे मेहकर-डोणगाव रोडवर गस्तीवर असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. तेंव्हा कंटेनर व बोलेरो हे दोन्ही वाहने रोडच्या खाली गेलेली होती. तर बोलेरोमध्ये चालक गजानन नागरे हा जीवंत दिसून आला. त्यानंतर नरोटे यांनी तात्काळ पोलीस व परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. दीड तासाने जेसीबीच्या सहाय्याने गजानन नागरे यास बाहेर काढले, परंतू बाहेर काढताच गजानननेही आपले प्राण सोडले.