खामगावातील अतिक्रमण महिनाभरात जैसे-थे; नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 03:03 PM2018-11-30T15:03:20+5:302018-11-30T15:04:18+5:30

महिनाभरापूर्वी काढलेले अतिक्रमणही ‘जैसे-थे’ झाल्याने, पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.

The encroachment on Khamgaon roads | खामगावातील अतिक्रमण महिनाभरात जैसे-थे; नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

खामगावातील अतिक्रमण महिनाभरात जैसे-थे; नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

googlenewsNext

खामगाव :  स्थानिक  मुख्य रस्त्यांसह विविध परिसराला अतिक्रमणाचा विळखा आहे. पालिकेची प्रशासकीय इमारत आणि व्यापारी संकुलांचीही यापासून सुटका नाही. महिनाभरापूर्वी काढलेले अतिक्रमणही ‘जैसे-थे’ झाल्याने, पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.

शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठेत अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाची आहे. मात्र, या पथकाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण पोफावत आहे. मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळीतही अतिक्रमण आहे. यापैकी काही अतिक्रमणांना राजकीय ‘आश्रय’ आहे. तर काही अतिक्रमणांवर पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाची ‘कृपादृष्टी’ आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अतिक्रमणाच्या गराड्यात असून, पालिकेची प्रशासकीय इमारतही अतिक्रमणाच्या गराड्यात आहे. अगदी महिनाभरापूर्वी काढण्यात आलेले अतिक्रमणही जैसे थे झाल्याने, पालिकेच्या अतिक्रमण निमुर्लन पथकाची कुंभकर्णी झोप उघडणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, पोलिस आणि पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या महिन्यात ऐन सणासुदीच्या दिवसात अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, आता शहरातील अतिक्रमणाची परिस्थिती पूर्ववत झाली आहे.

घाटपुरी रोडवरही अतिक्रण!

शहरातील घाटपुरी रोडवर पाण्याच्या टाकी समोरील एका शेता लगत मोठ्याप्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. विविध खाद्य पदार्थांच्या दुकानांसह मांस विक्रीचीही दुकाने या ठिकाणी थाटल्या जाताहेत. त्यामुळे रस्त्याची रूंदी कमी झाली असून, अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे. पालिका इमारतच अतिक्रमणाच्या गराड्यात असताना,  दुरवरचे अतिक्रमण पालिकेला दिसून येणार तरी कसे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


ग्रामीण पोलिस स्टेशन रस्त्यावर पक्के अतिक्रमण

शहरातील ग्रामीण पोलिस स्टेशन रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होत आहे. राजकीय आश्रयातून या ठिकाणी टीनशेड उभारून पक्की दुकानेही या ठिकाणी थाटली जाताहेत. जागा समतल करून अतिक्रमण करण्यात येत असतानाही या ठिकाणी कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते.

Web Title: The encroachment on Khamgaon roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.