बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण : संशयास्पद माहिती देणे गावकऱ्यांच्या अंगलट येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 18:36 IST2020-07-11T18:34:59+5:302020-07-11T18:36:52+5:30
संशयास्पद माहिती देणेही गावकऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत.

बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण : संशयास्पद माहिती देणे गावकऱ्यांच्या अंगलट येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील बोरजवळा येथील बाहुलीचे पोस्टमार्टेम प्रकरण पिंपळगाव राजा पोलिसांच्या अंगलट आले. त्यानंतर धडा घेतलेल्या पोलिसांनी आता गावकऱ्यांच्या दिशेने अंगुलीनिर्देश केला आहे. त्याचवेळी संशयास्पद माहिती देणेही गावकऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत.
पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बोरजवळा येथील तलावाच्या काठावर गुरूवारी रात्री साडे नऊ वाजता दरम्यान, कथित अर्भक सापडल्याची वार्ता पसरली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत, स्थानिकांच्या मदतीने तलावाच्या काठावरील पाण्यातून कथित अर्भक बाहेर काढले. पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यानंतर खामगाव येथील सामान्य रूग्णालयात कथित अर्भकाला पोस्टमार्टेमसाठी नेण्यात आले. पोस्टमार्टेम दरम्यान, कथित अर्भक बाहुली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोलिसांच्या पंचनाम्यावर अंगुलीनिर्देश होत असल्याने, हा प्रकार पोलिसांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे हा प्रकार कुणी केला; संयशास्पद संदेश कुणी पोहोचविला? कोरोना आपातकालिन परिस्थितीत पोलिसांची दिशाभूल कुणी केली? याचा शोध घेण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे ‘त्या’ बाहुलीचे ‘भूत’ आता गावकरांच्या मानगुटीवर असल्याची चर्चा परिसरात होत आहे.