साखरखेर्डा : चितोडा येथील वादग्रस्त विधानामुळे आमदार संजय गायकवाड यांच्या विरूध्द कारवाई करावी, या मागणीसाठी साखरखेर्डा येथे दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
खामगाव तालुक्यातील चितोडा येथे १९ जून रोजी दोन वेगवेगळ्या समाजांमध्ये वाद होऊन या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. त्यातील रमेश हिवराळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. परंतु त्यानंतर बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड हे ३० जून रोजी आपल्या ४०० ते ५०० समर्थकांना सोबत घेऊन चितोडा या गावी गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी दोन्ही परिवारांना शांत करण्याऐवजी, चिथावणीखोर भाषण केले. ॲट्रॉसिटीबद्दलसुद्धा बेताल वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंबेडकरी समाज प्रचंड आक्रमक झाला असून, साखरखेर्डा येथे ४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता आंबेडकरी अनुयायींच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व माजी सैनिक अर्जुन गवई तसेच भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस कैलास सुखदाने, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय गवई यांनी केले. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून थेट पोलीस स्टेशनमध्ये आला. त्यानंतर साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना तक्रार अर्ज देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखेडे, साखरखेर्डा माजी सरपंच कमलाकर गवई, दिलीप इंगळे, माजी सभापती राजू ठोके, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, बी. के. गवई, विशाल गवई, पुजाजी मोरे, प्रवीण गवई, संदीप इंगळे, सुशील मोरे, अशोक गवई, विनोद क्षीरसागर, अभय सरकटे, शुभम गवई, चेतन गवई, आकाश गवई आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित हाेते.