अवैध उत्खनन माफीयांना १८ लाख रुपये दंड
By Admin | Updated: February 24, 2015 00:19 IST2015-02-24T00:19:02+5:302015-02-24T00:19:02+5:30
मेहकार तालुक्यात अवैध मुरुम उत्खननासंदर्भात धडक कारवाई.

अवैध उत्खनन माफीयांना १८ लाख रुपये दंड
मेहकर (जि. बुलडाणा) : स्थानिक तहसिल कार्यालयाच्यावतीने अवैध उत्खनन माफीयांना १८ लाख ९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई तहसिलदार निर्भय जैन यांनी २१ फेब्रुवारी रोजी केली असून, यात २ जणांना दंडाचा आदेश पारित करण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, साखरखेर्डा येथील राजेंद्र काटे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मौजे कल्याणा ते बाभुळखेड रस्त्याच्या कामासाठी विनापरवाना ८0 ब्रास मुरुमाची वाहतूक केली. मौजे उसरण येथील विमलबाई भिमराव शेळके यांच्या मालकीच्या गट नं.३0/१ मधील जागेतून ३२५ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केले, असा पंचनामा नागझरी बु. येथील तलाठी गारोळे व कल्याणा येथील तलाठी तांबेकर यांनी केला होता. त्यावर राजेंद्र काटे यांना २0 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तहसिल कार्यालयात हजर राहण्याकरीता नोटीस देण्यात आली होती. परंतु ते हजर न राहल्याने २१ फेब्रुवारी रोजी तहसिलदार निर्भय जैन यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नियमान्वये ४0५ ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल राजेंद्र काटे यांना कलम ४८ (८) नुसार १२ लाख ९७ हजार रुपये दंडाचा आदेश पारीत केला आहे. त्यानंतर मौजे गोहोगाव ते डोणगाव रस्त्याच्या कामासाठी अे.जी.मापारी यांनी विना परवाना १६0 ब्रास मुरुमाचे उत्खनन केल्याचा पंचनामा तलाठी गोहोगाव यांनी १५ एप्रिल २0१४ रोजी केला होता. त्यानंतर अे.जी.मापारी यांना तहसिल कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात अनेकवेळा नोटीस दिल्या. परंतु ते एकदाही हजर राहिले नाही. त्यामुळे तहसिलदार निर्भय जैन यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नियमान्वये १६0 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याबद्दल अे.जी.मापारी यांना ५ लाख १२ हजार रुपये दंडाचा आदेश पारीत करण्यात आला आहे. तहसिलदार निर्भय जैन यांनी अवैध मुरुम उत्खननाबद्दल केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध उत्खनन माफीयांचे धाबे दणाणले आहेत.