अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक; पुणे ग्रामीण पोलिसांची 'मोठी' कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:17 IST2020-04-15T13:11:29+5:302020-04-15T13:17:34+5:30
तेलंगणा ते मुंबई अशी वाहतूक करत असताना गुटखा पकडला

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक; पुणे ग्रामीण पोलिसांची 'मोठी' कारवाई
बारामती: अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणारी गुटखा वाहतूक पुणे ग्रामीण पोलिसांनी उघड केली आहे .यामधे पोलिसांनी सुमारे गुटखासह 32.27 लाखांचा माल जप्त केला आहे .बारामती क्राईम ब्रांच पथकाचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांनी याबाबत माहिती दिली.त्यामध्ये प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक करत वाहतुक करत असताना मिळून आल्याने फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तेलंगणा ते मुंबई अशी वाहतूक करत असताना गुटखा पकडला आहे .या कारवाईत 22.27 लाखांच्या गुटख्यासह 32.27 लाखांचा माल जप्त केला आहे. वाहने तपासणी दरम्यान आयसर टेम्पोच्या हालचालीबाबत पोलिसांना संशय आला. त्यामुळे टेम्पोवर पाटस टोल नाक्यापर्यंत हालचालींवर लक्ष ठेऊन पाटस टोल नाका येथे ताब्यात घेण्यात आला.यावेळी पोलिसांनी विचारपूस केली असता चालकाने त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या गाडीत बिस्किटे आहेत, अशी सारवासारव त्याने केली. त्यास अधिक विचारपूस करून पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये कोणाही चेकिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीने आतील बाजूस गुटख्याची पोती भरून मागचे बाजूला बिस्कीट चे बॉक्स भरलेले मिळून आले.
सिकंदराबाद, तेलंगणा येथून पुण्याच्या दिशेने हा टेम्पो निघाला होता.सदर टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवाअसा छापील बोर्ड लावला होता.
टेम्पो तेलंगणा येथून 540 किमी प्रवास करून आले. या कालावधी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक करून एवढे मोठे अंतर पार करून टेम्पो या इथपर्यंत पोहचल्याचे निष्पन्न झाले आहे . आरोपींनी या वाहनाचा शासनाचा ' ऑनलाईन पास' सुद्धा मिळावला होता. ही कारवाई दि 14 ते 15 एप्रिल दरम्यान रात्री करण्यात आली.मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 रा.गाझीपुर उत्तर प्रदेश), शीलदेव कृष्ण रेड्डी( रा. सिकंदराबाद, हैदराबाद राज्य-तेलंगणा)अशी दोघा आरोपींची नावे आहेत. टेम्पोमध्ये गुटखा वाहतूक सुरू होती .यामध्ये 22,27,500 रुपये किमतीचा सागर , 2000 नावाचा गुटखा, 10 लाख रुपये किमतीचा टेम्पो एकूण 32,27,500 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,यवत पो स्टेचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, विशाल जावळे, पोलिस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, प्रशांत कर्णवर यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे करत आहेत