Navratri : मी दुर्गा : कोरोनाकाळात काम जोखमीचे : स्मिता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:27 IST2020-10-19T12:24:39+5:302020-10-19T12:27:27+5:30
navratri, kolhapurnews, sangli, police स्मिता पाटील मूळच्या सांगलीच्या. त्यांचे सासर पेठवडगाव (ता. हातकणंगले). नेमणुकीपासून त्यांचे नोकरीचे कार्यक्षेत्र कोल्हापूरच आहे. प्रथम लक्ष्मीपुरी, आता शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्या उपनिरीक्षक आहेत.

Navratri : मी दुर्गा : कोरोनाकाळात काम जोखमीचे : स्मिता पाटील
सचिन भोसले
सांगलीच्या पतंगराव कदम महााविद्यालयातून त्यांनी रसायनशास्त्रातून पदवी घेतली. २०१३ साली सांगली येथे माहेरहूनच पोलीस उपनिरीक्षकची पूर्वपरीक्षा दिली. दरम्यान त्यांचे लग्न पेठवडगाव येथील राजकुमार पाटील यांच्याशी झाले. त्या ही परीक्षा दिल्याचेही विसरून गेल्या.
दरम्यान त्यांना मुलगा झाला. बाळ दहा महिन्यांचे झाले. त्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्या. अंतिम परीक्षा देऊन त्या २०१५ साली उपनिरीक्षक झाल्या. पहिली नेमणूक लक्ष्मीपुरी ठाण्यात झाली. सेवाकाळात मूल लहान असल्याने रात्री-अपरात्री त्यांना कर्तव्यावर जावे लागत होते. मुलाची काळजी पती, सासू, नणंद घेत होते.
महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, आदी प्रकरणांचे काम त्यांच्याकडे आले. तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांची शाहूपुरी ठाण्यात बदली झाली. २०२० मध्ये या ठाण्यात येणाऱ्या महिलांविषयी गुन्हे, विविध गुन्ह्यांचा तपास, सरकारी कार्यालयांसमोरील बंदोबस्त अशा अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागत होते.
गुन्ह्याची उकल झाल्यानंतर ती महिला न्याय मिळाला म्हणून पाया पडायची, कुटुंबेही आशीर्वाद द्यायची. मार्चमध्ये कोरोनाचा वाढला आणि टोलनाका, रेल्वेस्टेशन, सीपीआर, आदी ठिकाणी कधीही कर्तव्य बजावावे लागले. एकेदिवशी सेवा बजावल्यानंतर दुचाकीच्या डिकीत ठेवलेला केक काढून धाकट्या मुलाचा वाढदिवस साजरा केल्याचेही त्या सांगतात.
कोरोनाकाळात टोलनाक्यांवर येणारे जनसमुदाय रोखण्याचे काम जोखमीचे होते. त्यांची समजूत काढताना नाकीनऊ यायचे. सकाळी सात वाजता घर सोडल्यानंतर रात्री येताना आपल्यामुळे कुटुंबाला कोरोना व्हायचा नाही ना, अशी शंका यायची. योग्य काळजी घेतल्याने खडखडीत राहिले. या काळात एक महिला पती, सासू छळ करतात म्हणून दाद मागण्यासाठी आली. तिचे शरीर मारहाणीमुळे काळेनिळे पडलेले. डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. तिला मुलांसह कर्नाटकातील वडिलांकडे जायचे होते. ई-पास नसल्याने तिला प्रवेश मिळेना. तिची तळमळ बघून पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन पास मिळवून दिला.
लहान मुलेही भुकेलेली असल्याने त्यांनाही खाऊ दिला. अखेरीस तिला पास मिळाला. ती वडिलांकडे गेली. जाताना नजरेतून व्यक्त केलेली कृतज्ञता काळजाला चर्रर्र करणारी होती. काळ कठीण असला तरी कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याचे समाधान वेगळेच होते.
जे काम तू करशील ते प्रामाणिकपणे कर असा सल्ला माझे पती कायम देतात. त्यांच्या प्रोत्साहनामुळे व वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे अनेक महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
- स्मिता संजय पाटील,
पोलिस उपनिरीक्षक , शाहूपुरी पोलिस ठाणे